मोदी सरकारचा खेळाडू आणि सेलिब्रिटींवर दबाव; गृहमंत्री करणार चौकशी
राजकारण

मोदी सरकारचा खेळाडू आणि सेलिब्रिटींवर दबाव; गृहमंत्री करणार चौकशी

नवी दिल्ली : मोदी सरकारने ट्विट करण्यासाठी खेळाडू तसंच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या संदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे. याचे कारण म्हणजे राजधानी दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर अनेक खेळाडू तसंच बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विट करत आपला देश विभागण्याचा प्रयत्न होत असून तसं होऊ देऊ नका, असं आवाहन केलं होतं. मात्र यावेळी काही सेलिब्रिटींचं ट्विट हे समान असल्याने अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, कॉंग्रेसने सेलिब्रिटींच्या ट्विटचा मुद्दा उपस्थित करत, सेलिब्रिटींवर दबाव टाकण्याता आला होता, याबद्दल माहिती घ्यावी अशी मागणी काँग्रेसने केली. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासंबंधी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे की, ‘कोणीही व्यक्तिगत पातळीवर मत व्यक्त करत असेल तर त्यावर आक्षेप असण्याचं कारण नाही. पण ट्विटची वेळ, भाषा पाहिली तर हे भाजपाच्या स्क्रिप्टनुसार करण्यात आलं का? याबाबत शंका निर्माण होते. अक्षय कुमार आणि सायना नेहवाल यांच्या ट्विटमधील शब्द समान आहेत. सुनील शेट्टीच्या ट्विटमध्ये भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याचाही उल्लेख आहे. त्यामुळे भाजपाच्या स्क्रिप्टप्रमाणे हे करण्यात आलं का? ही शंका निर्माण होते”.

तसेच, “देशपातळीवर मोठा प्रचंड दबाव संविधानिक संस्था तसंच विरोधी सरकारांवर आहे. जो कोणी विरोध करेल त्यांच्यावर दबाव आणला जातो. त्याच पार्श्वभूमीवर यांच्यावरही दबाव आणलेला असू शकतो. दबावात राहता कामा नये आणि बोलायचं असेल तर निर्भीडपणे बोलावं ही महाविकास आघाडी सरकारची जबाबदारी आहे. मोदी सरकार हे करत असेल आणि ते हे करण्याची शक्यता आहे त्यामुळे आम्ही चौकशीची मागणी केली होती. त्याचं गांभीर्य ओळखून गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत,” अशी माहिती सचिन सावंत यांनी दिली आहे.

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुप्तहेर विभाग यासंबंधी तपास करणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी खासकरुन अक्षय कुमार आणि सायना नेहवालच्या ट्विटचा उल्लेख करण्यात आला. दोन्ही ट्विटमध्ये असणाऱ्या साधर्म्य आश्चर्यकारक असल्याचं सांगण्यात आलं.