विधानपरिषदेला चंद्रकांत हंडोरेंचा पराभव स्वपक्षीयांमुळे, थेट अशोक चव्हाणांवर आरोप
राजकारण

विधानपरिषदेला चंद्रकांत हंडोरेंचा पराभव स्वपक्षीयांमुळे, थेट अशोक चव्हाणांवर आरोप

नांदेड : “विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांच्या पराभवाला माजी मंत्री अशोक चव्हाण जबाबदार आहेत. चव्हाणांना नेस्तनाबूत करण्याचा संकल्प भीम शक्ती संघटनेने केला आहे” असा इशारा भीमशक्ती संघटनेचे सरचिटणीस मोहन माने यांनी दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवाला माजी मंत्री अशोक चव्हाण जबाबदार आहेत. आगामी काळात चव्हाण यांना नेस्तनाबूत करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असा इशारा भीमशक्ती संघटनेचे सरचिटणीस मोहन माने यांनी दिलाय.

भीमशक्ती संघटनेचा एक मेळावा नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथे घेण्यात आला. या मेळाव्यात भीमशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हंडोरे यांच्या पराभवाचे विश्लेषण केलंय. हंडोरे यांच्या पराभवाला अशोक चव्हाण आणि त्यांचे नांदेडमधले सहकारी आमदार जबाबदार असल्याची घणाघाती टीका संघटनेने केलीय.

पक्षादेश झुगारून मतदान केलेल्यांवर मी नाराज आहे, त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर निर्णय घेऊ, असा इशाराच हंडोरे यांनी स्वकीयांना दिला होता. विधान परिषद निवडणुकीत पहिल्या फेरीअखेरीस काँग्रेसचे दोन्ही उमेदवार चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांच्यापैकी एकालाही ४६ मतांचा कोटा पूर्ण करता आला नव्हता.

काँग्रेसने पहिल्या पसंतीचा क्रम चंद्रकांत हंडोरे यांना दिला होता. म्हणजे त्यांचा या निवडणुकीतील विजय निश्चित मानण्यात येत होता. मात्र आमदारांनी हा क्रम मतदानात पाळला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच दुसऱ्या पसंतीची मतेही हंडोरे यांना मिळाली नाहीत, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हंडोरे नाराज आहेत.

चंद्रकांत हंडोरे कोण आहेत?

चंद्रकांत हंडोरे हे मुंबईतील चेंबुर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात त्यांनी सामाजिक न्याय मंत्री म्हणून धुरा सांभाळली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते उपाध्यक्ष आहेत.

२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत हंडोरे काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेच्या रिंगणात उतरले होते, मात्र शिवसेनेच्या प्रकाश फातर्पेकर यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का स्वीकारावा लागला होता. तर त्यानंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीचं तिकीट न मिळाल्याने त्यावेळी हंडोरे नाराज असल्याची चर्चा होती.