धनुष्यबाण चोरला नाही त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारला; उद्धव ठाकरे
राजकारण

धनुष्यबाण चोरला नाही त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारला; उद्धव ठाकरे

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी जमलेल्या शिवसैनिकांना ओपन जीपमधून संबोधित केलं. यावेळी त्यांनी प्रथमच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. धनुष्यबाण चोरलंय ते मर्द असतील तर त्यांनी धनुष्यबाण घेऊन या आम्ही मशाल घेऊन लढा देऊ, धनुष्यबाण चोरला नाही त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळपासूनच हजारो शिवसैनिकांनी मातोश्री बाहेर प्रचंड गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला शिवसैनिकांशी छोटासा संवाद साधला. पण त्यानंतरही शिवसैनिक काही हटायला तयार नव्हते. अखेर उद्धव ठाकरे दोन तासांनी पुन्हा बाहेर आले. यावेळी त्यांनी जीपवर उभं राहून खास ठाकरी शैलीत तडाखेबंद भाषण केलं.

मला कल्पना आहे की तुम्ही सर्वजण चिडलेले आहात. देशातील असा कोणताही पक्ष नसेल ज्यावर असा आघात झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना यंत्रणांचा वापर करुन पक्ष संपवता येतात असं वाटत असतील तर त्यांना सांगतो शिवसेना संपवता येणार नाही. तुमच्या किती पिढ्या आल्या तरी शिवसेना संपवता येणार नाही. यांना बाळासाहेबांचं नाव पाहिजे, पक्ष पाहिजे. शिवसेनेचं कुटुंब त्यांना नकोय. बाळासाहेबांचा मुखवटा घालून नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात यावं लागतंय ही आपली ताकद आहे.

ज्या पद्धतीनं आपलं शिवसेना हे नाव चोराला दिलं गेलं. आपलं धनुष्य बाण चोरांना दिला गेला. ज्या पद्धतीनं हे कपटानं राजकारण करतात त्या पद्धतीनं मशाल चिन्ह देखील घालवतील. पण, धनुष्यबाण चोरलंय त्यांना सांगतो तुमच्यापुढं मशाल चिन्ह घेऊन लढून दाखवतो.

मी कुठं खचलेलो नाही, खचणार नाही, तुमच्या ताकदीच्या जोरावर मी उभा आहे. काँग्रेस देखील फुटली होती त्यावेळी त्यांचं चिन्ह गोठवलं गेलं होतं. समाजवादी पक्षाच्या वेळी पुढच्या पक्षानं दावा सोडला त्यावेळी चिन्ह दिलं गेलं.जयललितांच्या वादावेळी वाद मिटल्यानं चिन्ह आणि नाव राहिलं. पण, पंतप्रधानांच्या गुलामानं पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं. ते गुलाम उद्या राज्यपाल होतील, एक न्यायमूर्ती देखील राज्यपाल झाल्याचा दाखला उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

माझ्या हातात काही नाही पण एवढंच सांगतो. तरुण रक्त त्यांनी चेतवलेलं आहे. आजपासून निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले. मी तुम्हाला भेटायला रस्त्यावर आलेलो आहे. खांद्याला खांद्याला लावून शिवाजी महाराजांचा भगवा खांद्यावर घेऊन चोरांना धडा शिकवू, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुमच्या किती पिढ्या आल्यातरी तुम्ही शिवसेनेला संपवू शकणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

अन् बाळासाहेब ठाकरे आठवले…
उद्धव ठाकरे यांना रणरणत्या उन्हात ओपन जीपवर उभे राहून भाषण देत होते. उद्धव ठाकरे यांचा हा अवतार पाहून शिवसैनिकांना चटकन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठण झाली. बाळासाहेबांनीही शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात एका गाडीच्या बोनेटवर उभं राहून भाषण केलं होतं.

अवती भोवती शेकडो शिवसैनिक आणि पँट शर्ट घातलेले बाळासाहेब जीपवरून भाषण करताना दिसत आहेत. गेट वे ऑफ इंडिया परिसरातील हा फोटो असल्याचं सांगितलं जातं. 30 ऑक्टोबर 1968मधील हा फोटो असल्याचं सांगितलं जातं. उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भाषणाने शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाल्या वाचून राहिली नाही.