राजीनाम्यासाठी १२ मंत्र्यांना कोणी केले फोन? अशी पार पडली प्रक्रिया
राजकारण

राजीनाम्यासाठी १२ मंत्र्यांना कोणी केले फोन? अशी पार पडली प्रक्रिया

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी पार पडला. यामध्ये नव्या चेहऱ्यांची जितकी चर्चा झाली, तितकीच चर्चा जुन्या चेहऱ्यांच्या राजीनाम्याची झाली. केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा या १२ मंत्र्यांनी कसा काय एवढ्या सहजासहजी दिला असेल, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

खूप सहजतेनं केंद्रिय मंत्रिमंडळातलील हा खांदेपालट झाला. यातील काहीजण तर मोदी सरकारच्या पहिल्या काळातही मंत्री होते. मात्र या सर्वांना एक फोन आला आणि काहीही आदळआपट न करता त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला. हा फोन साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा होता, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुमचा अंदाज चुकीचा आहे. स्वतः पंतप्रधानांनी हे फोन केले नाहीत. मंत्रीमंडळात कुणाचा समावेश करायचा आणि कुणाला डच्चू द्यायचा, याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला असला, तरी 11 जणांना त्यांच्यासाठीची बॅड न्यूज देणारा फोन स्वतः पंतप्रधानांनी केला नाही. केंद्र सरकारमधील मंत्रीमंडळाबाबतचे निर्णय हे स्वतः मोदीच घेत असल्यानं हा फोन गृहमंत्री अमित शाहांनीदेखिल केला नाही.

हे फोन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले होते. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या मंत्र्यांची नावं निश्चित केली आणि कुठल्या विद्यमान मंत्र्यांना नारळ द्यायचा, या यादीवर शिक्कामोर्तब केलं, तेव्हा ती यादी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हाती पोहोचली. मग, नड्डांनी सर्वांना फोन करून अवघड असणारं काम पूर्ण केलं. या सगळ्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. काहींना हे मंत्रिमंडळातील आणि पक्षातील शिस्तीचं धोरण वाटत होतं, तर काहीजणांच्या मते याला विरोध करून काहीच उपयोग होणार नसल्याची जाणीव असल्यामुळेच मंत्र्यांनी हा समजूतदारपणा दाखवल्याची चर्चा होती.