अजित पवारांची प्राजक्त तनपुरेंना म्हणाले; नगरच्या विकासनिधीसाठी ‘मामा’ची मदत घ्या नाही तर…
राजकारण

अजित पवारांची प्राजक्त तनपुरेंना म्हणाले; नगरच्या विकासनिधीसाठी ‘मामा’ची मदत घ्या नाही तर…

अहमदनगर : “प्राजक्त, नगरच्या विकासनिधीसाठी ‘मामा’ची मदत घ्या नाही तर माझाच मामा व्हायचा”, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशी मिश्कील टिप्पणी करताच नगरच्या सभेत हशा पिकला. अजित पवार अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी ‌येथे मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. यावेळी ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अजित पवार म्हणाले की, “मी पहिल्यांदा निवडून आलं होतो तेव्हा मलाही राज्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली होती. पण माझ्याकडे तीन खात्यांचा कार्यभार होता. आता तुमच्या या पठ्ठ्याला (प्राजक्त तनपुरे) पाच-सहा मंत्रालयांचं राज्यमंत्रिपद मिळालंय. वाढपी तुमचाच आहे, पंगत जेवायला बसलीय, राहुरीला जास्त मिळणार यात शंकाच नाही. पण वाढपी कशामुळे निवडून आला, तर कोपरगाव, संगमनेर, राहुरी, अहमदनगर अशा सगळ्या मतदारसंघांमुळे…” असा सल्लाही यावेळी अजित पवार यांनी दिला.

“प्राजक्ता, इथेही लक्ष दे रे बाबा, माझ्या बारामतीकडे नंतर लक्ष दिलंस तरी चालेल. पण सगळ्यांना वाटलं पाहिजे, राहुरीसारखं आमच्याकडेही लक्ष देतोय”, असं म्हणत अजितदादांनी एकाचवेळी कौतुक, टोले आणि टोमणे लगावले.

ते पुढे म्हणाले की, ”विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात दहा, अहमदनगरमधून राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून आले. सातवे शंकरराव गडाखही आले, आघाडीतले बाळासाहेब थोरात आले. आशुतोष काळे हा तरुण सहकारी आला, रोहित पवारला कर्जत जामखेडच्या जनतेने आशीर्वाद दिला. संग्राम जगताप दुसऱ्यांदा निवडून आला. शंकरराव सिनिअर आहेत, तेही दुसऱ्यांदा आले. बाळासाहेब थोरात तर 1985 पासून विधानसभेवर आहेत. त्यांची सातवी-आठवी टर्म आहे” असं अजित पवार सांगत आहेत.

तर, “काही लोक साहेबांना (राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार) सोडून गेले, अकोल्यात त्यांची काय गत झाली बघा, सोडून गेलेले पडले”, असं म्हणत खास त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांनी पिचड विषयावर भाष्य केलं राष्ट्रवादीचे तत्कालिन नेते मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनी विधानसभेच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला. त्यांचा हा भाजप प्रवेश राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागलाय. कारण आठवड्याभरापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नगर दौऱ्यात पिचड यांच्यावर निशाणा साधला होता. आज अजितदादांनीही पिचडांवर बोलताना भाजपत गेल्यापासून त्यांची अवस्था वाईट असल्याचं म्हटलं.