अजितदादा, पटेल अन् भुजबळ; पहिल्याच दौऱ्यात पवारांनी सर्वांनाच झोडपलं, टीकेवर जोरदार पलटवार
राजकारण

अजितदादा, पटेल अन् भुजबळ; पहिल्याच दौऱ्यात पवारांनी सर्वांनाच झोडपलं, टीकेवर जोरदार पलटवार

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांच्या समर्थक आमदारांनी बंड करून पक्षात फूट पाडल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची आज नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघात सभा होत आहे. शरद पवार यांच्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात भुजबळ यांच्या येवला येथून होत असून या सभेसाठी नाशिकमध्ये पोहोचलेल्या पवारांनी सभेआधी पत्रकार परिषद घेत बंडखोर नेत्यांनी केलेल्या आरोपांवर जोरदार पलटवार केला आहे. तसंच आपल्या दौऱ्याला सुरुवात करण्यासाठी नाशिकचीच निवड का केली, यामागचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नाशिक हा जिल्हा नेहमीच काँग्रेसी विचारांचा राहिला आहे. आमच्या सर्वांचे गुरू आणि प्रेरणास्थान असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनाही या जिल्ह्याने बिनविरोध संसदेत पाठवलं होतं. त्यामुळे नवीन कामाला सुरुवात करताना मी या जिल्ह्याची निवड केली,’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच आजची सभा मी टीका-टिपण्णी करण्यासाठी घेत नसल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबईत ५ जुलै रोजी घेतलेल्या मेळाव्यात अजित पवार यांनी पक्षातील नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे पक्षातील अनेक नेते पक्ष सोडून गेले, असा आरोप केला होता. यावर बोलताना शरद पवार यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. ‘ज्या व्यक्तीने कधीही भाजपसोबत चला, अशी मागणी केली नाही, त्याने पक्षाचं नुकसान झालं की ज्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी पक्षाचं नुकसान केलं?’ असा खरमरीत सवाल पवारांनी उपस्थित केला आहे.

छगन भुजबळांवर काय म्हणाले पवार?

आजची सभा ही टीका-टिपण्णी करण्यासाठी नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलं असलं तरी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पवार यांनी छगन भुजबळ यांना केलेल्या मदतीची आठवण करून दिली आहे. ‘शिवसेनेतून बाहेर पडलेल्या छगन भुजबळ यांचा मुंबईत पराभव झाला होता. मात्र ते विधानसभेत असावेत यासाठी मी येवला या आमच्या विचारांच्या मतदारसंघातील सहकाऱ्यांशी चर्चा करून भुजबळ यांना इथे आणलं. आता जे आमच्यापासून बाजूला गेले त्यांच्याबद्दल आम्ही काही ठरवणार नाही, लोक ठरवतील,’ असं ते म्हणाले.

प्रफुल पटेलांच्या दाव्यातील हवा काढली!

शरद पवार यांनी पक्षाची धुरा सुप्रिया सुळेंच्या हाती दिल्याचा आरोप नुकताच प्रफुल पटेल यांनी केला होता. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘राष्ट्रवादी पक्ष स्थापनेपासून अनेक वर्ष सत्तेत होता. मात्र अनेकदा संधी असूनही सुप्रियाला मी मंत्री केलं नाही. याउलट पटेल यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद दिलं. लोकसभेला पराभूत झाल्यानंतर राज्यसभेत संधी दिली’

दरम्यान, आज सकाळी ८ वाजता सिल्व्हर ओक या निवासस्थानावरून शरद पवार हे दौऱ्यावर निघाले आहेत. ठाणे, भिवंडी, पडघा, शहापूर, इगतपुरी या मार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी त्यांचं जोरदार स्वागत केलं.