उद्धव ठाकरेजी, तो प्रस्ताव नेमका असतो तरी कसा? प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल अन् चर्चांना उधाण
राजकारण

उद्धव ठाकरेजी, तो प्रस्ताव नेमका असतो तरी कसा? प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल अन् चर्चांना उधाण

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल १५ दिवसांत परिस्थिती स्पष्ट करण्याचं आवाहन केलं होतं. त्यावर ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊतांनी यांनी आंबेडकरांना आघाडीचा प्रस्ताव दिल्याचं उत्तर दिलं होतं. या सर्व घडामोडींनंतर आज प्रकाश आंबेडकरांनी परत एकदा भाष्य केलं आहे. ते अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

‘ठाकरे गटासोबत आमची मुंबई महापालिकेच्या जागावाटपाच्या अनुषंगानं चर्चा झालीय. मात्र, पुढच्या निवडणुकांच्या जागावाटपाचा प्रस्ताव त्यांनी आम्हाला मागितला आहे, तो प्रस्ताव नेमका कसा असतो?, ते ठाकरेंनी स्पष्ट करावं. विनायकरावांनी असा प्रस्ताव राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला दिलाय का? महाविकास आघाडीला जो प्रस्ताव दिलेला आहे, त्या प्रस्तावाची एक कॉपी आम्हाला द्या. आम्ही त्याचा अभ्यास करतो आणि त्याच पद्धतीने आम्ही प्रस्ताव देतो. कारण आम्हाला बघितला पाहिजे की प्रस्ताव कसा असतो, म्हणजे हे पहिल्यांदाच ऐकतोय राजकारणामध्ये की प्रस्तावावरती चर्चा असते. मला ४० वर्षे ज्या राजकारणामध्ये झाले, त्यात प्रस्ताव हा शब्दही ऐकलेला नव्हता’, असं आंबेडकर म्हणाले.

उद्धव-राज यांच्या संभाव्य आघाडीच्या चर्चेवर ते ‘नो कॉमेंट’ बोलले. महाविकास आघाडीतील समावेशाची आपली केस लढायला आपले वकील उद्धव ठाकरे सक्षम असल्यामुळे वकील बदलण्याचा प्रश्नच नाहीय. खंडपीठातील दोन न्यायाधीशांपैकी आता एकच राहीला, असा तिरकस टोला राष्ट्रवादीतील फुटीवर प्रकाश आंबेडकरांनी लगावला.

समान नागरी कायद्याचा मसुदा सरकारनं जाहीर करावा

समान नागरी कायद्याचा मसुदा सरकारनं जाहीर करावा, असं आवाहन आंबेडकरांनी केंद्र सरकारला केलं आहे. समान नागरी कायद्याच्या नव्या प्रस्तावित मसुद्यात हिंदू लग्न पद्धतीवर काय लिहिलं आहे, हे या सरकारनं आधी स्पष्ट करावं, अशी मागणी आंबेडकरांनी केली.

येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आणि संघ परिवाराचा समान नागरी कायद्याचा घाट असू शकतो. या कायद्याचा मसुदा जाहीर करून मगच त्यावर चर्चा करा. लग्नाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. जेव्हा एकत्रित करायचं म्हटलं तर या दोन विवाह पद्धतींपैकी कुठली तरी एक विवाह पद्धत स्वीकारावी लागेल. कारण लग्नविधी हा सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. या ठिकाणी जी घाई चाललेली आहे, ही घाई हिंदू समाजातच भांडण लावण्याची अशी असणारी परिस्थिती आहे, अशी टीका त्यांनी केली.