शिंदे गटाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अर्ज, शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
राजकारण

शिंदे गटाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अर्ज, शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची ओळख असलेला शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा हायजॅक करण्याच्यादृष्टीने आता शिंदे गटाने निर्णायक पाऊल टाकले आहे. शिंदे गटाकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठीच्या परवानगीचा अर्ज मुंबई महानगरपालिकेकडे सादर केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून यापूर्वीच दसरा मेळाव्यासाठी (Dasra Melava) परवानगी मागण्यात आली होती. मात्र, मुंबई महानगरपालिकेने ही परवानगी रोखून धरली होती. त्यानंतर आता शिंदे गटानेच शिवाजी पार्कवर मेळावा घ्यायचे ठरवले आहे. पालिकेकडे अर्ज सादर करून शिंदे गटाने तशा हालचालीही सुरु केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या मुद्द्यावरु शिंदे गटावर टीकास्त्र सोडले आहे. शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले जाते आणि दुसरीकडे ढोंगीपणा केला जातो. शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा मेळावा रोखणे, हा म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा पुढे नेली. मात्र, आता त्यामध्ये खोडा घातला जात आहे. हा कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न आहे. नुसते शाब्दिक फवारे उडवून हिंदुत्व सिद्ध होत नाही. ही शिवसेनेची ५६ वर्षांची परंपरा आहे. त्याला ब्रेक देऊ नका. मी हात जोडून विनंती करते की, असे करु नका. कारण ज्याच्या हातात सत्ता आहे, त्याचे परिणाम लोकांना दिसत आहेत, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.

तर दुसरीकडे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी अर्ज करणारे आमदार सदा सरवणकर यांनी आम्ही रितसर अर्ज केल्याचे स्पष्ट केले. आम्ही कोणत्याही गटासाठी हा अर्ज दाखल केलेला नाही. शिवसेनेच्या दरवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी हा अर्ज आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका कोणाला परवानगी देते, हे बघुयात, असे सदा सरवणकर यांनी म्हटले.