फडणवीसांची पवारांवर टीका; दादांच्या पोटातले ओठावर आले…
राजकारण

फडणवीसांची पवारांवर टीका; दादांच्या पोटातले ओठावर आले…

मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली. पहिल्याच दिवशी सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्षातील नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. अधिवेशनाला सुरवात झाल्यानंतर राज्यपालांनी 12 सदस्यांची नियुक्ती जाहीर करताच आपण वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करू, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. मात्र याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून विरोध केला. ”दादांच्या पोटातले ओठावर आले. हा विदर्भ-मराठावाड्यातील जनतेला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न आहे. अशी सणसणीत टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरू होताच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मराठवाडा, विदर्भातील वैधानिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा मुद्दा उपस्थित केला. वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना का केली नाही? 72 दिवस झाले तरी सरकार काही करत नाही. या राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील लोक राहतात, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी विदर्भ आणि मराठवाडा विकास महामंडळ आम्ही स्थापन करणार आहोत. बजेटमध्ये तसा निधीही ठेवला आहे. ज्या दिवशी राज्यपाल 12 आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी वैधानिक विकास महामंडळ घोषित करू, असं अजित पवार यांनी सांगितलं.

मात्र अजित पवारांच्या या उत्तराला विरोध करत, ” अजितदादा जे तुमच्या पोटात होतं ते ओठावर आलं. 12 सदस्यांसाठी विदर्भ आणि मराठवाड्याला ओलीस धरणं योग्य नाही. मराठवाड्यातील लोक हे कदापीही सहन करणार नाही. राज्यपाल आणि तुमचं जे काही सुरू आहे. त्याच्याशी या सभागृहाला काहीही घेणं देणं नाही. वैधानिक विकास महामंडळ हा आमचा हक्क आहे. आम्ही भीक मागत नाही. आम्ही भिकारी नाही. वैधानिक विकास महामंडळ करा किंवा करू नका, ते आमच्या हक्काचं आहे, आम्ही मिळवून घेऊच,” अशा शब्दात उत्तर दिलं.

यानंतर मुनगंटीवार म्हणाले की, ”तुमच्या 12 आमदारांशी आमचं काही घेणंदेणं नाही. तुम्ही कुणाची नावं दिली हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. तुम्ही 12 चे 24 आमदार करा, त्यांच्याशी आमचं काहीही घेणंदेणं नाही. तुम्हाला हातजोडून विनंती आहे, आजच वैधानिक विकास महामंडळ जाहीर करा. हवं तर मी अर्थसंकल्पावर बोलणार नाही.” मात्र यावर अजित पवार म्हणाले की, ” महामंडळाच्या अनुषंगाने कुणीही राजकारण करू नये. आम्ही महामंडळ तयार करणारच आहोत. उद्याच्या अर्थसंकल्पात महामंडळ अस्तित्वात आहे असं गृहित धरूनच आम्ही निधीची तरतूद करणार आहोत. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी एक पैसाही आम्ही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही पवार यांनी दिली.

मात्र, सरकारने वर्षभर विदर्भ आणि मराठवाड्याच्या वैधानिक विकास महामंडळला मुदत वाढ दिली नाही. असे सांगत मुनगंटीवार म्हणाले, सरकारने जनतेसोबत विश्वासघात केला आहे. वैधानिक विकास महामंडळाच कवच ने देता सरकार निधीची तरतूद करत आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला पैसे खर्च न होता नसतीच्या माध्यमातून इतर भागात खर्च होतील. त्यामुळे नवीन अनुशेष आणि पुन्हा समिती नेमावा लागेल, असं सांगत सरकारने आजच्या आजच वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.