राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांना स्थगिती
राजकारण

राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांना स्थगिती

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असला तरी तिसऱ्या लाटेची भीतीमुळे आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे राज्यातील ५ जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही माहिती दिली. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या जिल्हा परिषदांमधील ७० निवडणूक विभाग आणि ३३ पंचायत समित्यांमधील १३० निर्वाचक गणांमधली पोटनिवडणुकसाठी मतदान होणार होते. मात्र कोरोनाचं संकट पाहता या पोटनिवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

पोटनिवडणुकीसााठी १९ जुलैला मतदान होणार होतं. मात्र ७ जुलैला राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती. ६ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेत राज्य निवडणूक आयोगाने सरकारकडे अहवाल मागितला होता. यात कोरोनाबाबतची अधिकची माहिती आणि सविस्तर अहवाल मागितला होता. त्यानंतर आज निवडणूक आयोगाने पोटनिवडणुका स्थगित केल्या आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकांसाठी असलेली आचारसंहितादेखली शिथिल करण्यात आली आहे. राज्यातील कोरोना स्थिती सुधारल्यानंतर पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडले जातील, असंही राज्य निवडणूक आयोगने स्पष्ट केलं आहे.