सनी देओल यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून वाय प्लस श्रेणीची सुरक्षा
राजकारण

सनी देओल यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून वाय प्लस श्रेणीची सुरक्षा

नवी दिल्ली : जीवाला धोका असल्या कारणानं भाजप खासदार सनी देओल यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून वाय प्लस श्रेणीची सुरक्षा पुरवण्यात आलीय. यापुढे सनी देओल यांच्यासोबत केंद्रीय सुरक्षा दलाची एक टीम नेहमी उपस्थित राहणार आहे. या अगोदर सनी देओल यांना पंजाब पोलीस दलाच्या कमांडोद्वारे सुरक्षा मिळत होती. वाय प्लस दर्जाच्या सुरक्षेत सनी देओल यांच्यासोबत ११ जवान आणि २ पीएसओ तैनात असणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आय़बीच्या रिपोर्टनुसार व सनी देओल यांच्या सुरक्षेबाबत मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत ही वाढ केल्या गेल्याचे सांगितले जात आहे. सनी देओल पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघाचे भाजपा’चे खासदार आहेत. गुरुदासपूर भारत आणि पाकिस्तानाच्या सीमेनजिक भाग आहे. अशावेळी त्यांच्या सुरक्षेबाबत धोका देखील निर्माण होऊ शकतो. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत अशावेळी वाढ करण्यात आली आहे, ज्यावेळी पंजाबमध्ये केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी अतिशय आक्रमक झालेले आहेत. शेतकरी संघटनांकडून भाजपा मंत्री तसेच नेत्यांना घेरण्याचाही प्रयत्न होत आहे.

सनी देओल यांच्या सुरक्षेत वाढ अशा वेळेस करण्यात आलीय जेव्हा देशात मुख्यत: राजधानी दिल्लीत कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या दरम्यान शेतकरी संघटनांकडून भाजप मंत्र्यांना आणि नेत्याना घेराव घालण्याची योजना तयार करण्यात आली होती. सनी देओल हे पंजाबचे असूनही त्यांनी कृषी कायद्यावर मात्र पर्यंत मौन बाळगलेले आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. तसेच, शेतकरी आंदोलनावरही तोडगा निघालेला नसल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय घेतला गेल्याचे दिसत आहे.

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकी अगोदर भाजपाच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. अगोदरच अकाली दलने साथ सोडलेली आहे, त्यात आता कृषी कायद्यावरून शेतकरी प्रचंड नाराज असून, केंद्र सरकारविरोधात आंदोलन सुरू आहे. ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा : यात ११ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. यात एक किंवा दोन कमांडो तसंच दोन पीएसओंचादेखील समावेश असतो.