जयंत पाटलांच्या भाजपा प्रवेशाच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंनी उडवली खिल्ली
राजकारण

जयंत पाटलांच्या भाजपा प्रवेशाच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंनी उडवली खिल्ली

मुंबई : “नारायण राणे हे कोणत्या जयंत पाटील यांच्याबद्दल बोलत होते मला समजलं नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक जयंत पाटील आहेत. नारायण राणे यांनी ‘राष्ट्रवादीचे जयंत पाटील’ असा स्पष्ट उल्लेख केल्याचं मला तरी आठवत नाही. अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, ‘मी स्वत: राज्याच्या राजकारणात कार्यरत असणाऱ्या चार-पाच महत्त्वाच्या जयंत पाटील नावाच्या नेत्यांना ओळखते. त्यामुळे मला माहिती नाही की राणे नक्की कोणत्या जयंत पाटील यांच्याबद्दल बोलत होते”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी नारायण राणेंच्या दाव्याची खिल्ली उडवली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भाजपाचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल एक खळबळजन विधान केलं. “राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं नसतं, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तुम्हाला आज भाजपात दिसले असते. त्यांची भाजपाताली वरिष्ठ नेत्यांशी या संदर्भात चर्चादेखील झाली होती”, असा दावा त्यांनी केला. या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

तसेच “महाविकास आघाडीची सत्ता नसती तर जयंत पाटील भाजपात येणार होते. त्यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चादेखील झाली होती. जयंत पाटील यांना मी त्यांच्या इस्लामपुरात जाऊन उत्तर देणार आहे. त्यांच्याबाबत जी माझ्याकडे माहिती आहे, ती मी तिथेच जाऊन उघड करणार आहे. पुढचं सरकार आमचंच येणार असं जयंत पाटील सातत्याने म्हणत आहेत. कदाचित पुढील सरकारमध्येही मी मंत्री असेन असं त्यांना म्हणायचं असेल, असं राणे म्हणाले होते.

या आरोपावर उत्तर देताना जयंत पाटील यांनी भाजप नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. ‘दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे. आलेली सत्ता जाते व ती पुन्हा मिळवता येते ही पवार साहेबांची शिकवण आहे. त्यामुळे सत्ता हा विषय माझ्यासाठी गौण आहे,’ असं प्रत्युत्तर ट्विटरद्वारे जयंत पाटील यांनी दिलं आहे.

‘माझ्या पुरते सांगायचे झाले तर माझी भाजपच्या कोणत्याही वरीष्ठ नेत्याशी भाजपमध्ये जाण्याबाबत चर्चा झाली नाही म्हणून हा खुलासा. मी शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता असल्याने असा विचार माझ्या मनात कधीच शिवत नाही. त्यामुळे मागील 5 वर्षे सरकारच्या विरोधात विधीमंडळात लढत होतो,’ असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.