ममता बनर्जींना मोठा धक्का; खासदाराचा थेट राज्यसभेतच राजीनामा
राजकारण

ममता बनर्जींना मोठा धक्का; खासदाराचा थेट राज्यसभेतच राजीनामा

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसला असून पक्षाचे ज्येष्ठ नेते दिनेश त्रिवेदी यांनी राज्यसभेतच खासदारकीचा राजीनामा दिला आहे. दिनेश त्रिवेदी यांनी राज्यसभेमध्ये त्यांच्या भाषणादरम्यान राजीनामा दिल्याने सर्वांसाठी हा मोठा धक्का होता. अशा प्रकारे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याचा राजीनामा ममता बॅनर्जींसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दिनेश त्रिवेदी येत्या एक-दोन दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी शक्यता आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

‘मी आज राज्यसभेचा राजीनामा देत आहे. माझ्या राज्यात हिंसाचार होत आहे आणि आम्ही येथे काहीही बोलू शकत नाही’, अशी कटू प्रतिक्रिया देत टीएमसीचे राज्यसभेचे खासदार दिनेश त्रिवेदी यांनी पक्षाला रामराम केला. दिनेश त्रिवेदी यांनी अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान असे म्हटले की बंगालच्या विकासासाठी मी राजीनामा देत आहे.

तृणमूल कॉंग्रेसचे आणखी काही खासदार भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत पक्षाचे आणखी काही खासदार राजीनामा देऊ शकतात, ही शक्यता नाकारता येत नाही. बंगालमधील निवडणुका होण्यापूर्वी अनेक आमदार आणि ज्येष्ठ नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत, यामध्ये आता दिनेश त्रिवेदी यांचेही नाव जोडले जाऊ शकते.