पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राऊत म्हणाले; हा राजकीय, भावनिक विषय…
राजकारण

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राऊत म्हणाले; हा राजकीय, भावनिक विषय…

पुणे : “हा जो विषय आहे, तो फक्त राजकीय नाही. हा राजकीय, भावनिक विषय आहे, तसेच पोलिस तपास करीत आहेत. आम्ही कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करून तपासात दिशाभूल करणे किंवा अडथळे आणणे, असं आम्ही करणार नाही,” असे स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या चर्चेचा विषय बनत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधल्या एका मंत्र्याचे नाव जोडले गेल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता “राज्यातील सरकार कोणालाही पाठीशी घालत नाहीय आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेवर आपण सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे” असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

“कोरोनाचं कारण पुढे करून संसद होऊ दिली नाही. हे चंद्रकांत दादा विसरले का? हे देशावर नव्हे तर जगावर आलेल संकट आहे. ते निमित्त वैगरे नाही. ते संकटच आहे. पाच वर्ष सत्तेत राहिलेल्या चंद्रकांत दादा सारख्या व्यक्तीने अशा प्रकारचे भाष्य करावे. हे दुर्देव आहे आणि कशा करिता आम्ही घाबरत आहोत. आज ही १७० च बहुमत आमच्याकडे आहे. आम्ही सरकार स्थापन करताना देखील सांगितले होते. आम्हाला बहुमताची अजिबात चिंता नाही. आम्हाला चिंता आहे ती म्हणजे या संसर्गाची” असे राऊत म्हणाले.

दरम्यान, राज्यातील २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुक ऐतिहासिक ठरली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने आघाडी सरकारची स्थपना केली. आता राज्यात आगामी महापालिका निवडणुकाचे वेध सुरु झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा विरोधात महाविकास आघाडी कशा पद्धतीने या निवडणुका लढेल, यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

”आगामी पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढायची हे सूत्र ठरलं आहे. पुणे, पिंपरी- चिंचवड अशा काही महापालिका आहेत, जिथे राष्ट्रवादीची ताकद शिवसेनेपेक्षा जास्त आहे. तिथे पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुका एकत्र कशा लढायच्या, या बद्दल अजित पवारांबरोबर चर्चा करु. तसेच, एकत्र निवडणुकूच लढलो तर निश्चित सत्ता परिवर्तनाच्या दिशेने सुरुवात होईल असे संजय राऊत यांनी सांगितले.