राजू शेट्टींची आमदारांच्या यादीतून नाव गायब? शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
राजकारण

राजू शेट्टींची आमदारांच्या यादीतून नाव गायब? शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

पुणे : माजी खासदार राजू शेट्टी यांचे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून नाव मागे घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, ही चर्चा सुरू झाल्यापासून राजू शेट्टींनी देखील उघडपणे नाराजी व्यक्त करत, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्य सरकारवर निशाणा साधला. विशेष, म्हणजे राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त करत, आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या अगोदर विधान परिषदेसाठी पवारांनी शब्द दिला होता, असं माध्यमांसमोर बोलून दाखवलं आहे. या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना मी दिलेला शब्द हा पाळलेला आहे, असं सांगितलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पवार म्हणाले, राजू शेट्टी नाराज असतील त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जी यादी राज्यपालांना उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. त्यामध्ये राजू शेट्टी यांनी सहकाराच्या क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिलं आहे. ते लक्षात घेऊन त्यांना विधानपरिषदेवर घ्यावं, राज्यपालांकडे असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. त्या संबंधीचा अंतिम निर्णय हा राज्यपालांकडून आलेला नाही. त्यामुळे एकदा आम्ही हा निर्णय घेतल्यानंतर, या निर्णयाबाबतची अंतिम भूमिका ही राज्यपालांना घ्यायची असताना, मला आश्चर्य वाटतं की अशाप्रकारची विधानं कशी केली जातात? किंवा आणखी काय, काय… पण आम्ही आमचं काम प्रामाणिकपणाने केलेलं आहे.

राजू शेट्टींना काय वक्तव्य करायचं असेल, तर मला त्यावर भाष्य करायचं नाही. पण मी दिलेला शब्द हा पाळलेला आहे. आता राज्यपाल काय करतात याची आम्ही वाट पाहतो आहोत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.