सत्ता गेली, पण वलय कायम! बारामतीत अजित पवारांना भेटण्यासाठी नागरिकांच्या रांगा
राजकारण

सत्ता गेली, पण वलय कायम! बारामतीत अजित पवारांना भेटण्यासाठी नागरिकांच्या रांगा

बारामती: सत्ता असो किंवा नसो पण कायम लोकांच्या गराड्यात राहणाऱ्या राज्यातील नेत्यांमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा क्रमांक वरचा आहे. संपत्ती किंवा सत्ता गेल्यानंतर अनेकांचे दिवसही फिरतात, असे सर्वसाधारपणे पाहायला मिळते. पण अजित पवार (Ajit Pawar) या गोष्टीला अपवाद ठरताना दिसत आहेत. कारण सत्तेवरून पायउतार झाल्यानंतरही जनता आपल्या समस्या सोडवण्यासाठी अजूनही अजित पवार यांच्याकडेच धाव घेत असल्याचे दिसत आहे. अजित पवार यांनी रविवारी बारामतीमध्ये आयोजित केलेल्या जनता दरबाराच्यानिमित्ताने याचा प्रत्यय आला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विरोधी पक्ष नेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. येथील विद्याप्रतिष्ठान येथे ते जनता दरबार घेत आहेत. मतदार संघातील लोकांना त्यांच्या कामासाठी पुणे- मुंबईत भेटायला येऊ लागू नये, म्हणून पवार स्वतः लोकांना भेटत असतात. यावेळी सर्व शासकीय अधिकारी वर्ग उपस्थित असतो. नागरिकांचे ज्या विभागाकडे काम आहे, त्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडे ते नागरिकांचे निवेदन देतात आणि तत्काळ मार्ग काढण्याचे आदेश अजित पवार देत असतात. अजितदादा उपमुख्यमंत्री असल्यापासून सुरु असलेला हा शिरस्ता आता त्यांची सत्ता गेल्यावरही कायम आहे. त्यामुळेच बारामतीमध्ये आज अजित पवारांना भेटण्यासाठी लोकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. यानिमित्ताने अजित पवार यांनी पुन्हा एकदा प्रशासनावर त्यांचा असलेला वचक दाखवून दिला आहे.

सत्तापालट झाल्यानंतर महाविकास आघाडीचे अनेक नेते पूर्वीइतके सक्रिय राहिलेले नाहीत. मात्र, अजित पवार त्याला अपवाद ठरताना दिसत आहेत. सत्ता गेल्यामुळे खचून न जाता अजितदादा आणखी जोमाने काम करताना दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनाच अजित पवार यांची विरोधी पक्षनेते म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. पावसाळी अधिवेशनाचे कामकाज साधारण ५ ते ६ दिवस चालले. या सर्व दिवसांमध्ये अजित पवार यांनी आपला प्रभाव दाखवून दिला. जवळपास प्रत्येक दिवशी अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना धारेवर धरत होते. अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना अनेक मंत्र्यांची भंबेरी उडत होती. या मंत्र्यांना सावरून घेण्यासाठी भाजपचे आमदार सभागृहात आक्रमक होत होते. मात्र, अजित पवार यांनी सर्वांनाच आपला हिसका दाखवला होता.