‘मोदींमुळेच सुषमा स्वराज आणि अरुण जेटलींचा मृत्यू’
राजकारण

‘मोदींमुळेच सुषमा स्वराज आणि अरुण जेटलींचा मृत्यू’

चेन्नई : द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिने यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांच्या मृत्यू झाल्याचे बोलले आहे. त्यांनी केलेल्या छळामुळे आणि दबावामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचं उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी वैंकय्या नायडूंसारख्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळवण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना डावललं जात असल्याच्या मोदींच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं. ते एका सभेत बोलत होते. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. तुम्ही सर्वांनाच बाजूला केलं. मिस्टर मोदी, मी ई पलानीस्वामी नाही जो तुम्हाला घाबरेल आणि तुमच्यासमोर झुकेल. मी उदयनिधी स्टॅलिन आहे, असं यावेळी ते म्हणाले.

यादरम्यान उदयनिधी स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या गंभीर आरोपांना सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज यांनी उत्तर दिलं आहे. उदयनिधी यांनी आपल्या आईच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करु नये असं त्यांनी म्हटलं आहे.

अरुण जेटली यांची मुलगी सोनाली जेटली यांनीही ट्विटरच्या माध्यमातून उदयनिधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. उदयनिधीजी तुमच्यावर निवडणुकीचा दबाव आहे हे मी समजू शकते. पण तुम्ही माझ्या वडिलांच्या आठवणींचा अनादर करणार असाल तर शांत बसणार नाही. नरेंद्र मोदी आणि अरुण जेटलींमध्ये राजकारणापलीकडचे संबंध होते. ही मैत्री तुम्हाला कळावी अशी प्रार्थना करते, असं त्यांनी म्हटलं आहे.