राज्याचा कारभार देवेंद्र फडणवीस हेच चालवतायेत; पहिल्याच पत्रकारपरिषदेत संजय राऊतांची ‘गुगली’
राजकारण

राज्याचा कारभार देवेंद्र फडणवीस हेच चालवतायेत; पहिल्याच पत्रकारपरिषदेत संजय राऊतांची ‘गुगली’

मुंबई: मी तुरुंगात असताना राज्य सरकारने काही चांगले निर्णय घेतले आहेत. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. माझ्या काही कामासंदर्भात मी आता त्यांना भेटायला जाणार असल्याचे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. यावेळी तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार का, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनी म्हटले की, मला वाटतं की राज्याचा कारभार देवेंद्र फडणवीस हेच चालवत आहेत. ते अनुभवी नेते आहेत. अलीकडच्या काळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या पत्रकारपरिषदेत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचा आवर्जून केलेला उल्लेख राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. मी तुरुंगात असताना राज्य सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले. मी त्या निर्णयांचं स्वागत करतो. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. मी तुरुंगात असताना मला जेव्हा जेव्हा वर्तमानपत्र वाचायला मिळायचे, तेव्हा मी याबद्दल माहिती घेत होतो. गरीबांना घरं देण्याचा निर्णय आणि म्हाडाला अधिकार देण्याचा निर्णय हे देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय आहेत. आमच्या सरकारने म्हाडाचे अधिकार काढून घेतले होते. ही गोष्ट मला फारशी आवडली नव्हती. पण या सरकारने म्हाडाला पुन्हा अधिकार दिले, असे संजय राऊत यांनी म्हटले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीचा कौतुकमिश्रीत सूर पाहून राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.