सुषमा अंधारे मात्र जोरानं किल्ला लढवत असताना, दीपाली सय्यद, उर्मिला मातोंडकर आहेत कुठे?
राजकारण

सुषमा अंधारे मात्र जोरानं किल्ला लढवत असताना, दीपाली सय्यद, उर्मिला मातोंडकर आहेत कुठे?

मुंबई : शिवसेनेच्या दोन रणरागिणी म्हणजे ऊर्मिला मातोंडकर आणि दीपाली सय्यद. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर दोघींनी उदधव ठाकरे यांच्या बाजूने जोरदार खिंड लढवली होती, पण अचानक या दोघी राजकीय पटलावरुन गायब झाल्या आहेत. ऊर्मिला मातोंडकर यांची ट्विटरवरची शेवटची राजकीय पोस्ट ही 30 जुलैची होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या विधानावर टीका करणारी ही पोस्ट होती. त्याआधी तीनच दिवस म्हणजे 27 जुलैला त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पण त्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी कोणताही राजकीय पोस्ट केली नाही. विशेष म्हणजे शिंदे यांच्या बंडानंतर ऊर्मिला मातोंडकर या उद्धव ठाकरेंच्या बाजूनं किल्ला लढवत होत्या. पण जुलैनंतर उर्मिला मातोंडकर यांनी राजकीय पोस्ट करणच सोडून दिलंय. दीपाली सय्यद यांचं ट्विटर अकाऊंट (Tweeter) डिऍक्टीव्ह झाल्याचं समजतंय. पण त्या इन्स्टाग्रामवर ऍक्टीव्ह असतात. त्यांनीही राजकीय पोस्ट करणं सोडलंय. त्यांची शेवटची सामाजिक पोस्ट ही 7 ऑक्टोबरची आहे.

नगर-श्रीगोंदा तालुक्यातील पाणीप्रश्नासाठी त्यांनी उपोषण केलं, त्याला यश मिळालं तेव्हा सय्यद यांनी इन्स्टाग्राम पोस्ट करुन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानले. पण उद्धव ठाकरेंच्या बाजूनं त्यांची कोणतीही पोस्ट महिन्याभरात नाही. विशेष म्हणजे ऊर्मिला आणि दीपाली दोघीही इतर पक्षांमधून शिवसेनेत आल्या होत्या. उर्मिलांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढली होती. त्यानंतर त्यांनी हाती शिवबंधन बांधलं होतं.

राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या यादीतून उर्मिला यांना विधानपरिषदेची आमदारकी मिळेल अशी चर्चा होती. पण शिंदेंच्या बंडानंतर सारंच बारगळलं. दुसरीकडे दीपाली सय्यद शिवसंग्राम आणि आम आदमी पक्ष असा प्रवास करुन शिवसेनेत दाखल झाल्या होत्या. ब्रिजभूषण मनसे वादात त्यांनी उद्धव ठाकरेंची बाजू जोमानं लावून धरली होती. इतकंच काय तर ठाकरे-शिंदेंनी एक व्हायला हवं, त्यासाठी प्रयत्न करु असं विधानही सय्यद यांनी केलं होतं.

पण महिन्याभरापासून ना दीपाली सय्यद सक्रिय आहेत ना उर्मिला मातोंडकर. त्याचवेळी काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटात आलेल्या सुषमा अंधारे मात्र जोरानं किल्ला लढवतायत. उद्धव ठाकरेंसाठी अडचणीचा काळ सुरु आहे, अशात शिवसेनेचा सेलिब्रिटी चेहरा अशी ओळख असणाऱ्या उर्मिला आणि सय्यद मात्र फार सक्रिय का दिसत नाहीयेत याची चर्चा सुरु झालीय.