प्रदेशाध्यक्षांची घसरली जीभ; मुख्यमंत्र्यांनी मध्यरात्री मागितली काँग्रेस नेत्याची माफी
राजकारण

प्रदेशाध्यक्षांची घसरली जीभ; मुख्यमंत्र्यांनी मध्यरात्री मागितली काँग्रेस नेत्याची माफी

देहरादून : उत्तराखंडच्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना मध्यरात्री ट्विट करून काँग्रेसच्या नेत्या आणि विरोधी पक्षनेत्या इंदिरा ह्रदयेश यांची माफी मागितली आहे. प्रदेशाध्यक्ष बन्सीधर भगत यांची ह्रदयेश यांच्यावर टीका करताना जीभ घसरली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बन्सीधर भगत यांनी भीमताल दौऱ्यात असताना विरोधी पक्षनेत्या इंदिरा ह्रदयेश यांच्यावर निशाणा साधला होता. टीका करत असताना भगत यांनी ह्रदयेश यांच्या वयावरून वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे काँग्रेसनं संताप व्यक्त करत भाजपला धारेवर धरलं. इंदिरा ह्रदयेश यांनीही ट्विट करून भगत यांना प्रत्युत्तर दिलं होतं. राज्यातील महिला योग्य वेळी याचं उत्तर देतील, असा इशाराही त्यांनी दिला होता.

रावत यांनी मध्यरात्री १२:३० वाजता ट्विट करून माफी प्रदेशाध्यक्ष भगत यांनी केलेल्या विधानाबद्दल मागितली. आदरणीय इंदिरा ह्रदयेश बहिणजी, आज मी खूप दुःखी आहे. आमच्यासाठी महिला सन्मानीय आणि पूज्यनीय आहेत. मी तुमची आणि माझ्याप्रमाणेच दुःखी असलेल्यांची माफी मागतो. मी उद्या तुमच्याशी बोलेन. पुनःश्च क्षमा मागतो, असं ट्विट करत मुख्यमंत्री रावत यांनी वादावर पडदा टाकला.

भाजपचा कोणताही आमदार वा मंत्री काँग्रेसच्या संपर्कात नाही. असं तर नाही ना की विरोधी पक्षनेत्या आपल्या मुलासह भाजपात प्रवेश करतील. पण, मी असेपर्यंत त्यांना भाजपमध्ये येता येणार नाही, अशी टीका भगत यांनी केली. याचवेळी भगत यांनी इंदिरा ह्रदयेश वृद्ध झाल्या आहेत, आता त्यांच्या संपर्कात कोण येणार आहे? बुडत्या जहाजाच्या कोण संपर्कात येतं?, असं विधान केलं होतं. त्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.