सरकारकडून कठोर निर्बधांचे संकेत; लॉकडाउनला मात्र राष्ट्रवादीचा विरोध
राजकारण

सरकारकडून कठोर निर्बधांचे संकेत; लॉकडाउनला मात्र राष्ट्रवादीचा विरोध

मुंबई : वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून लॉकडाउनचा इशारा दिला जात असताना महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने लॉकडाऊनला स्पष्ट विरोध दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्याला आणि जनतेला लॉकडाउन परवडणारा नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इतर पर्यायांचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मलिक म्हणाले की, महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. एका दिवसात ४० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. निश्चितच लॉकडाउन हे राज्याला, जनतेला कोणालाच परवडणारं नाही. आम्ही सर्वांनी मुख्यमंत्र्यांकडे लॉकडाउन हा पर्याय नसल्याचा आग्रह धरला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यांनी प्रशासनाला लॉकडाउनची तयारी करण्यास सांगितलं आहे. पण याचा अर्थ लॉकडाउन अपरिहार्य आहे असं नाही. जर लोकांनी नियम पाळले तर लॉकडाउन टाळता येऊ शकतो.

राज्यातील करोना रुग्णवाढ नियंत्रणात आणण्याचे आव्हान महाविकास आघाडी सरकारपुढे आहे. मात्र, संपूर्ण टाळेबंदीऐवजी सार्वजनिक ठिकाणी गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी परिस्थितीनुरूप कठोर निर्बंधांवर भर देण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.