मनसे-शिवसेना वाद आणखी पेटणार? संदीप देशपांडेचा ठाकरे सरकारला इशारा
राजकारण

मनसे-शिवसेना वाद आणखी पेटणार? संदीप देशपांडेचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई : मराठी भाषा दिनानिमित्त मनसेकडून मराठी स्वाक्षरी मोहीमेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मनसेच्या या मोहिमेला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली. तसेच मोहिमेचे आयोजक मनसे नेते अमेय खोपकर यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे मराठी राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर मनसे-शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला पोहचला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोविड नियमांचे पालन करूनच मनसेने मराठी भाषा दिन कार्यक्रम आयोजित केला होता, तरीही सरकारने कोरोनाचं कारण देत परवानगी नाकरलीच पण कारवाईचा धाक दाखवला असल्याचा आरोप अमेय खोपकर यांनी केला. ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत अशा संजय राठोडासारख्या मंत्र्याचे समर्थक लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन करतात, अशा गर्दीवर कारवाई करण्याची ज्यांच्यात धमक नाही, त्यांच्या डोळ्यात मराठी भाषा दिवस का खुपतो? महाबिघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर नाही यावर शिक्कामोर्तबच झालंय, पण त्यापुढे जाऊन आता शंका यायला लागली आहे की, हे सरकार अमराठी आहे की काय? नियोजित कार्यक्रम आम्ही सर्व नियम पाळून करणार म्हणजे करणारच असा अमेय खोपकरांनी ठणकावून सांगितलं आहे.

तर दुसरीकडे अमेय खोपकरांना नोटीस पाठवल्यामुळे मनसेने आक्रमक झाली आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. ”हिंमत असेल तर अमेय खोपकरांना अटक करून दाखवाच,” असं विधान केले आहे, त्यामुळे मनसे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

तसेच, मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यातील मराठी माणसांना पत्र लिहिले आहे. ” महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन साजरा करण्याच्या निमित्ताने आठवडाभर काही थोडेफार शासकीय कार्यक्रम होतील, काही एक घोषणा होतील, मराठी भाषेच्या अस्तित्वाबद्दल चिंता व्यक्त केली जाईल आणि पुढचे ३५८ दिवस या सगळ्याचा विसर पडेल. मराठीचं काय होणार? यापेक्षा ती कशी अधिक समृद्ध होईल, ती रोजच्या वापरात कशी येईल आणि ती आपली ओळख कशी बनेल याचा विचार करणं आणि त्यासाठी कृती करणे हे जास्त महत्त्वाचे आहे.” असं त्यांनी म्हंटल आहे.