तर मला मंत्रालयात कसे येता येईल?; रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारला सवाल
राजकारण

तर मला मंत्रालयात कसे येता येईल?; रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई : “राज्यसरकारने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबेरंगी आणि नक्षीकामवाल्या कपड्यांच्या पोशाखास मनाई करण्यात आली आहे. अशी मनाई जर मंत्र्यांनाही लागू केल्यास मला मंत्रालयात कसे येता येईल?”, असा थेट सवाल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे सरकारला एक प्रश्न विचारला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात कोणते कपडे घालावे आणि कोणते नाही यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नव्हते. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. सरकारकडून सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश राज्य सरकारने जाहीर केले आहेत. मंत्रालयात आता जिन्स आणि टी शर्ट घालता येणार नाही.

शिवाय गडद रंगाचे चित्रविचित्र कपडे घालण्यास राज्य सरकारकडून मनाई घालण्यात आली आहे.
कार्यालयात कामकाज करणारे बरेचसे आधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित असताना शासकीय कर्मचाऱ्यांना अनुरूप ठरेल, अशा वेशभूषेचा वापर करीत नाहीत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलीन होते अशा निष्कर्षाला पोहोचत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. याच मुद्द्यावरून रामदास आठवले यांनी हा प्रश्न सरकारला केला आहे. रामदास आठवले यांना कायम रंगीबेरंगी कपड्यातच दिसतात. त्यांची स्वतःची वेगळी अशी एक ड्रेसिंग स्टाईल आहे. ते कायम रंगीत कपडे परिधान करून त्यावर एखादं जॅकेट घालून सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावतात.

दरम्यान, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पोशाख कसा असावा याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. मंत्रालयात देश-विदेशातील नेते, अधिकारी येत असतात. कर्मचाऱ्यांच्या वेशभूषेवरूनच ते कार्यरत असलेल्या आस्थापनेची विशिष्ट छाप भेट देणाऱ्यांवर पडते. त्यामुळे शासकीय कार्यालयात काम करीत असताना कार्यालयातील सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाबद्दल तसेच वेशभूषेबद्दल जागरूक राहावे. आपली वेशभूषा ही शासकीय कार्यालयास अनुरूप ठरेल याची काळजी घ्यावी. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याचबरोबर महिला कर्मचाऱ्यांना देखील नवा ड्रेसकोड ठरवून देण्यात आला आहे. महिलांना कार्यालयात साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा, ट्राऊझर घालणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे आठवड्यातून एकदा म्हणजे शुक्रवारी सर्व कर्मचाऱ्यांनी खादीचे कपडे घालावेत असं देखील नव्या नियमांत सांगितले आहे.