तुम्हीच सच्चे शिवसैनिक; मुख्यमंत्र्यांचा राणेंना खोचक टोला
राजकारण

तुम्हीच सच्चे शिवसैनिक; मुख्यमंत्र्यांचा राणेंना खोचक टोला

मुंबई : ”तुम्ही सच्चे शिवसैनिक आहात. कोकणासाठी तुम्ही मागणी केली, नाहीतर काही जण केवळ स्वतःसाठी मागत असतात,” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा खासदार नारायण राणे यांना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांचे नाव न घेता टोला लगावला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ” तुम्ही रत्नागिरीसाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मागितले. तुम्ही स्वत:साठी काही मागू शकला असतात. मात्र, तसे केले नाहीत. काही जण असतात, इकडे तिकडे काही करून स्वत:साठी काही ना काही तरी मागतात. तुम्ही मात्र कोकणासाठी मागितले. याचा मला अभिमान वाटतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तुम्ही सच्चे शिवसैनिक आहात. त्यामुळेच तुम्ही स्वत:साठी काही मागितले नाही, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, ”मेडिकल कॉलेजची घोषणा आजही मी करू शकतो. मात्र, मला खोटे बोलता येत नाही. कोकणात कॉलेज करायचे हे माझ्या लक्षात आहे. हे काम करू शकतो की नाही, याची खात्री होत नाही, तोपर्यंत मी तुम्हांला शब्द देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

तसेच, ”या योजना पूर्ण झाल्यानंतर मी स्वत: उद्घाटन करण्यासाठी कोकणात येईन. अनेकदा योजनांची घोषणा केली जाते. भूमिपूजन केले जाते आणि पुढे काम होत नाही. मात्र, आपल्या सरकारकडून तसे होणार नाही. या योजनांचा शुभारंभ झालाय. त्या आपण पूर्ण करणार आहोत, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिले. त्याचबरोबर, यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या संसर्गपासून सावध राहण्याच्या पुन्हा एकदा सूचना केल्या. कोरोना होऊ नये म्हणून त्रिसूत्री पाळा. शक्य असेल तर वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले.