श्रीलंका क्रिकेटमध्ये भूकंप; भारत दौऱ्यापूर्वी 5 जणांची माघार
क्रीडा

श्रीलंका क्रिकेटमध्ये भूकंप; भारत दौऱ्यापूर्वी 5 जणांची माघार

मुंबई : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर दाखल झाला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली मुख्य टीम सध्या इंग्लंडमध्ये आहे. त्यामुळे या भारतीय टीममध्ये अनेक तरुण खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय टीमच्या बेंच स्ट्रेंथची परीक्षा या दौऱ्यावर होणार आहे. मात्र ही मालिका सुरु होण्यापूर्वी श्रीलंका क्रिकेटमध्ये भूकंप झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि प्रमुख खेळाडूंमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादानं आणखी गंभीर वळण घेतलं आहे. श्रीलंकेच्या पाच खेळाडूंनी भारताविरुद्धच्या मालिकेसाठी असलेल्या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. लाहिरु कुमारा, कशून रजिता. विश्वा फर्नांडो, अशेन बंडारा आणि लसिथ एबुलडेनिया या पाच जणांनी करार करण्यास नकार दिला. इतकंच नाही तर, हे सर्व टीमचा कॅम्प सोडून निघून गेले आहेत. श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एश्ले डी सिल्वा यांनी ही माहिती दिली आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंमध्ये गेल्या काही दिवसांपासून वेतन कराराच्या मुद्यावर वाद सुरु आहे. हा वाद अद्याप समाप्त झालेला नाही. डीसिल्वा यांनी दिलेल्या माहितीनुसार या विषयावर खेळाडूंबरोबर झालेली चर्चा निष्फळ ठरली. मुख्य कराराचा वाद संपेपर्यंत या मालिकेसाठीच असलेल्या करारावर स्वाक्षरी करण्याची सूचना या खेळाडूंना बोर्डाने केली होती. या स्वाक्षरीनंतर सर्व खेळाडू बायो-बबलमध्ये प्रवेश करणार होते. पण, त्यांनी करारवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. तसेच ते टीमच्या कॅम्पमधूनही बाहेर पडले आहेत.

तीन खेळाडू वर्षभरासाठी निलंबित
श्रीलंकेची टीम सध्या इंग्लंडमध्ये आहे. या मालिकेत टीमला एकही विजय मिळवता आलेला नाही. त्याचबरोबर या टीमच्या तीन खेळाडूंनी बायो-बबल मोडल्याचं उघड झालं. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कुसल मेंडिस, निरोशन डिकवेला आणि धनुष्का गुणतिलका यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.