आगरकरचा पत्ता कट; निवड समितीचं अध्यक्षपद ‘या’ खेळाडूच्या हातात
क्रीडा

आगरकरचा पत्ता कट; निवड समितीचं अध्यक्षपद ‘या’ खेळाडूच्या हातात

मुंबई : निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी मराठमोळा भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरचे नाव चर्चेत होते. पंरतु त्याचा पत्ता कट झाला असून चेतन शर्मा यांची भारतीय संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने आज तीन जणांच्या निवड समिती सदस्यांची घोषणा केली. यामध्ये चेतन शर्मा निवड समितीचे अध्यक्ष आहेत. तर अॅबी कुरुविल्ला आणि देबाशिष मोहंती हे निवड समितीचे सदस्य असणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मदन लाल, आर. पी. सिंग आणि सुलक्षणा नाईक या क्रिकेट सल्लागार समितीने आज निवड समिती सदस्यांची घोषणा केली. यामध्ये त्यांनी चेतन शर्मा यांच्याकडे निवड समितीचे अध्यक्षपद सोपवलं आहे. ही निवड एका वर्षासाठी करण्यात आली आहे. बीसीसीआयनं ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

भारतीय संघाच्या निवड समितीसाठी आगरकरबरोबरच चेतन शर्मा, मनिंदर सिंग, अॅबी कुरुविल्ला, शिवसुंदर दास, देबाशिष मोहंती, रणदेब बोस, नयन मोंगिया, विजय दाहिया यांनी अर्ज केले होते. यामधून पाच जणांची सल्लागार समिती केली होती. या पाच माजी खेळाडूंमधून तिघांना निवड समिती सदस्य म्हणून सधी दिली आहे. पण ज्या पाच खेळाडूंची सल्लागार समितीने निवड केली होती, त्यामध्ये सर्वाधिक सामने हे अजित आगरकरच्या नावावर होते. त्यामुळे आगरकरची निवड करण्यात का आली नाही, हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडेलला आहे.

दरम्यान, चेतन शर्मा यांनी ८८ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. ५४ वर्षीय शर्मा यांनी जानेवारी महिन्यातच निवड समितीसाठी अर्ज केला होता. पण विद्यमान समितीतील दक्षिण विभागाच्या एमएसके प्रसाद यांची जागा सुनील जोशी यांनी घेतली. त्याचबरोबर गगन खोडाच्या जागी हरविंदर सिंगची निवड बीसीसीआयने केली होती. मात्र, यावेळी क्रिकेट सल्लागार समितीने चेतन शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.