ख्रिस गेलची मोठा विक्रम! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा एकमेव फलंदाज
क्रीडा

ख्रिस गेलची मोठा विक्रम! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा एकमेव फलंदाज

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर ख्रिस गेलने टी -२० क्रिकेट सामन्यामध्ये इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेच्या तिसर्‍या टी -२० सामन्यात गेलने ३८ चेंडूत ६७ धावा केल्या. या दरम्यान गेलने सात षटकार आणि चार चौकार लगावले. ९व्या षटकात अ‍ॅडम झॅम्पांच्या पहिल्या चेंडूवर लाँग ओव्हरवर षटकार ठोकला आणि या मोठ्या शॉटसह त्याने टी -२० सामन्यामध्ये मोठा विक्रम केला. गेलने या सामन्यामध्ये टी -२० क्रिकेटमध्ये १४ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. टी -२० क्रिकेटमधील १४ हजार धावांचा टप्पा गाठणारा ख्रिस गेल जगातील पहिला फलंदाज बनला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या सामन्यापूर्वी गेलच्या खात्यात १३९७१ धावा होत्या. त्याने ६७ धावांच्या खेळीसह १४ हजार धावांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. गेलच्या शानदार फलंदाजीमुळे वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा गडी राखून विजय मिळवला. या विजयासह वेस्ट इंडीजने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली आहे. टी -२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी ख्रिस गेलची पुनरागमन होणे वेस्ट इंडीज क्रिकेट संघासाठी मोठी दिलासादायक बाब आहे.

ख्रिस गेलच्या या शानदार खेळीसाठी त्या मॅन ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आले. गेलने आपली ही दमदार खेळी ड्वेन ब्राव्हो आणि कर्णधार कायरन पोलार्डला समर्पित केली आहे. या सामन्यापूर्वी ब्राव्होने गेलसाठी भावनिक पोस्ट शेअर केली होती. गेलने वर्षानुवर्षे संघाचे वजन आपल्या खांद्यावर उचलले आहे आणि आता या संघाची वेळ आली आहे, असे त्यामध्ये लिहिले होते. गेलने सामन्यानंतर सांगितले की ब्राव्हो आणि पोलार्डने कठीण काळात त्याला साथ दिली.