दिल्ली पोलिसांना महागात पडली सुशील कुमारसोबत फोटो काढण्याची हौस
क्रीडा

दिल्ली पोलिसांना महागात पडली सुशील कुमारसोबत फोटो काढण्याची हौस

नवी दिल्ली : अटकेत असताना कुस्तीपटू सुशिलकुमारसोबत फोटो काढण्याची हौस दिल्ली पोलिसांना चांगलीच महागात पडली आहे. शुक्रवारी सुशीलकुमारला मंडोली तुरुंगातून तिहार जेलमध्ये हलवण्यात आलं. यावेळी मंडोली तुरुंगाबाहेर दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारसोबत काढलेले फोटो आणि सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटोसेशन आता पोलिसांना चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कुस्तीपटू सागर धनकार हत्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने सुशील कुमारला ९ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, मंडोली तुरुंगाबाहेर त्याला पोलीस व्हॅनमध्ये बसवताना दिल्ली आर्म्ड पोलिसांच्या थर्ड बटालियनच्या पोलिसांनी सुशील कुमारसोबत फोटोसेशन केलं. काही अधिकाऱ्यांनी त्यावेळी सुशील कुमारसोबत सेल्फी देखील काढले. सुशील कुमारला असलेला धोका लक्षात घेता त्याच्यासोबत सुरक्षेसाठी विशेष पोलीस पथक देखील तैनात असतं. मात्र, हे पथक मांडोलीला पोहोचल्यानंतर त्यांनी आरोपीसोबत फोटो काढण्यास सुरुवात केली. त्याच्यासोबतच्या थर्ड बटालियनच्या पोलिसांना अशा प्रकारच्या हाय रिस्क कैद्यांचे फोटो काढून त्यांच्या वरीष्ठांना पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे त्यांच्यावर नजर ठेवणं शक्य होतं. मात्र, शुक्रवारी त्याच्यासोबतच्या पोलिसांनी त्याच्यासोबतचे फोटो वरीष्ठांना पाठवण्यासोबतच ऑफिसच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आणि त्यांच्या नातेवाईकांना पाठवायला सुरुवात केली. त्यामुळे हा प्रकार समोर आला असून त्याच्या अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, सुशील कुमारसोबत दिल्ली पोलिसांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी देखील त्याला ट्रोल केलं होतं. काही नेटिझन्सनी त्याला जेलमध्ये विशेष उपचार दिले जात आहेत का? तो जेलमध्ये जातोय की ऑलिम्पिकमध्ये? असे प्रश्न देखील उपस्थित केले.