कुस्ती क्षेत्र पुन्हा हादरलं; सुशिलकुमारनंतर आणखी एका सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूला अटक
क्रीडा

कुस्ती क्षेत्र पुन्हा हादरलं; सुशिलकुमारनंतर आणखी एका सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूला अटक

नवी दिल्ली : भारताचा स्टार कुस्तीपटू सुशील कुमारच्या अटकेनंतर सध्या कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील माजी सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू मनजितला दरोडा आणि अवैध दारुच्या विक्रीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

द्वारकाचे डीसीपी संतोषकुमार मीना यांनी सांगितले, की विशेष पथकाने कौशल गँगचा सक्रिय सदस्य मनजित याला २४ मे रोजी नजफगड भागातून अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि चोरी केलेले मोबाइल जप्त केले. मनजीतविरोधात शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनजीतने शालेय दिवसांपासून कुस्तीच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली होती. २०१०मध्ये ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या ५५ किलो वजनी गटात त्याने सुवर्णपदक जिंकले होते. मात्र, यानंतर तो चुकीच्या मार्गी गेला आणि विविध गुन्ह्यात सामील झाला.

डीसीपी म्हणाले, मनजितने त्याच्या सहाय्यकांसह हरयाणा येथून २०१२मध्ये एक कार चोरी केली होती. २०१३मध्ये त्याला प्रथम अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला २०१९मध्ये अटक करण्यात आली. मनजित भोंदसी कारागृहात कौशल गँगच्या संपर्कात आला आणि त्यांचाच एक भाग झाला. २०२१च्या फेब्रुवारीमध्ये तुरूंगातून सुटल्यानंतर मनजीतने हरयाणा येथून दिल्लीला अवैध दारू विक्री करण्यास सुरवात केली होती.