इंग्लंडचा भारतावर दणदणीत विजय; कोहलीची खेळी व्यर्थ
क्रीडा

इंग्लंडचा भारतावर दणदणीत विजय; कोहलीची खेळी व्यर्थ

चेन्नई: चेन्नईत पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा इंग्लंडकडून २२७ धावांनी पराभव झाला. अखेरच्या दिवशी भारतीय फलंदाजांनी खराब कामगिरी केली. भारताचा दुसरा डाव फक्त १९७ धावात संपुष्ठात आला. या विजयासह इंग्लंडने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चेपॉकच्या पाटा विकेटवर अखेरच्या दिवशी भारतीय संघाला ३८१ तर इंग्लंडला ९ विकेटची गरज होती. काल रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजार यांनी पाचव्या दिवशी भारतीय डावाची सुरूवात केली. जॅक लीचने पुजाराला १६ धावांवर बाद करून भारताला दुसरा धक्का दिला. त्यानंतर गिलने वेगाने खेळ करत सलग तिसऱ्या कसोटीत अर्धशतक पूर्ण केले. पण अर्धशतकानंतर जेम्स एंडरसनने त्याला त्रिफळाचित केले.

गिल बाद झाल्यानंतर कर्णधार कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे मैदानावर होते. गिलला बाद केल्यानंतरच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये एंडरसनने रहाणेला देखील माघारी पाठवले. रहाणे बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ४ बाद ९२ अशी झाली होती. रहाणेच्या जागी आलेल्या ऋषभ पंतकडून ऑस्ट्रेलियातील सिडनी आणि ब्रिस्बेन प्रमाणे मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण त्याला देखील एंडरसनने ११ धावांवर बाद केले. ११०वर भारताचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये गेला.

ऑस्ट्रेलियातील चौथ्या आणि या कसोटीतील पहिल्या डावात अर्धशतक करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला डोमिनिक बेसने शून्यावर बाद केले. विराट आणि अश्विन या दोघांनी १७१ धावसंख्येपर्यंत संघाला नेले. लीचने अश्विनला बाद केले आणि भारताला सातवा धक्का दिला. त्यानंतर विराटने कसोटीतील २४वे अर्धशतक झळकावले. विराट आणि नदीम किती वेळ मैदानावर थांबतात याची उत्सुकता होती. पण स्टोक्सने विराटची बोल्ड घेतली आणि विजयातील मोठा अडथळा दूर केला. त्यानंतर नदीमला लीचने तर जोफ्रा आर्चरने बुमराहला बाद करत विजयावर शिक्कामोर्तम केले.