रिषभ पंतची दमदार कामगिरी; दुसऱ्या दिवसअखेर भारत मजबूत स्थितीत
क्रीडा

रिषभ पंतची दमदार कामगिरी; दुसऱ्या दिवसअखेर भारत मजबूत स्थितीत

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात पहिल्या दिवसात पाहुण्यांचा आख्खा संघ अवघ्या २०५ धावांवर गारद झाल्यानंतर मैदानात आलेल्या भारतीय संघाचीही सुरुवात खराब झाली होती. सलामीवीर शुभमन गिल भोपळाही न फोडता बाद झाला. त्यानंतर संघाच्या केवळ ८० धावा फलकावर लागलेल्या असताना भारताची वरची फळी तंबूत परतली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा पुजारा आणि रोहित शर्मा यांनी सुरुवातीला संथ पण आश्वासक सुरुवात देखील केली. पण कालच्या धावसंख्येमध्ये फक्त १६ धावांची भर घालून पुजारा वैयक्तिक १७ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ कर्णधार विराट कोहली भोपळाही न फोडता माघारी परतला.

भरवशाच्या अजिंक्य रहाणेला साथीला घेऊन रोहित शर्माने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण २७ धावांवर अजिंक्य रहाणे देखील अँडरसनची शिकार ठरला आणि पहिल्या सत्राचा खेळ संपला! त्यानंतर आलेल्या रिषभ पंतला साथीला घेऊन एक बाजू लावून धरणाऱ्या रोहित शर्माने डावाला आकार दिला. ही जोडी स्थिरावत असल्याचं वाटत असतानाच रोहित शर्मा वैयक्तिक ४९ धावसंख्येवर असताना बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर श्रषभ पंतने एक बाजू सावरून धरत वॉशिंग्टन सुंदरच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. वॉशिंग्टन सुंदरनेही वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करत पंतला चांगली साथ दिली. शतक पूर्ण केल्या १ धावाची भर टाकत पंत बाद झाला. मात्र, आणखी पडझड न होऊ देता सुंदरने भारताला ३००च्या घरात नेऊन ठेवले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा भारताने ७ बाद २९४ धावांपर्यंत मजल मारली होती. भारताकडे आतापर्यंत एकूण ८९ धावांची आघाडी झाली आहे.