युवराज दाखलेवर तडीपारीची कारवाई; आयुक्त कृष्ण प्रकाश यांची माहिती
पुणे बातमी

युवराज दाखलेवर तडीपारीची कारवाई; आयुक्त कृष्ण प्रकाश यांची माहिती

पुणे : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवराज दाखलेला अटक केल्यानंतर आता त्याचवर थेट तडीपारीची कारवाई होणार आहे. अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणाऱ्या युवराज दाखले यानं हा आरोप करणारा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याविरोधात भाजपाच्या कार्यकर्त्या कोमल शिंदे यांनी फिर्याद दिल्यानंतर हा प्रकार समोर आला होता. युवराज दाखलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल देखील झाला होता.
त्यानंतर वाकड पोलिसांनी काही तासातच युवराजला अटक केली. या प्रकरणी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातली माहिती दिली आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना एका तृतीयपंथी व्यक्तीला खोटं आश्वासन देऊन त्याच्यासोबत समलैंगिक संबंध ठेवले होते’, असा वादग्रस्त आरोप युवराज दाखलेनं केला होता. युवराज दाखले याच्यावर फसवणुकीच्या गुन्ह्यासह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

महाराष्ट्रातील मुंबई, शिक्रापूर, चाकण, सांगवी आणि वाकड पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हे दाखल असून ते न्यायप्रविष्ट असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील नाना पटोले आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला होता. त्यावरून अजित पवारांनी विधानसभेतच संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं. विधानसभेत अजित पवार यांनी संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये युवराज दाखलेला पिंपरी-चिंचवडमधून वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.