सेमीफायनलचे ५ फॅक्टर; इंग्लंडवर भारी पडू शकते टीम इंडिया
क्रीडा

सेमीफायनलचे ५ फॅक्टर; इंग्लंडवर भारी पडू शकते टीम इंडिया

ऑस्ट्रेलियाचं यजमानपद असलेल्या टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये आज १० नोव्हेंबर रोजी दुसरा उपांत्य सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडिया आणि इंग्लंड आमने-सामने असतील. हा सामना अॅडिलेड ओवल मैदानावर भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता खेळवला जाणार आहे. इंग्लंड संघाचा कर्णधार जॉस बटलर आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्याकडे आपापल्या संघांना फायनलचं तिकीट मिळवून देण्याची आजची सुवर्णसंधी आहे. या दोन संघांपैकी जो संघ हा सामना जिंकेल, तो संघ अंतिम फेरीत १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्नमध्ये पाकिस्तानसोबत आमेनसामने असेल. भारतीय संघाकडे ५ अशा गोष्टी आहेत, ज्याच्या जोरावर इंग्लंडचा पराभव करता येऊ शकतो.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोहली – सूर्याचा फॉर्म

या स्पर्धेत विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. या टी-२० विश्वचाह्स्क २०२२च्या सीजनमध्ये कोहलीने आतापर्यंत सर्वाधिक २४६ धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा केलेल्या यादीमध्ये सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्याने या स्पर्धेत २२५ धावा केल्या आहेत. या दोघांनी आजच्या सामन्यात पुन्हा एकदा धावांचा पाऊस पाडला, तर इंग्लंडचा एकतर्फी पराभव होऊ शकतो.
ओपनिंगमध्ये कॅप्टन रोहित शर्मा अजूनही चांगल्या फॉर्ममध्ये नाही, तर केएल राहुलने आपल्या फॉर्मात परतला आहे. या दोघांनी आज चांगली कामगिरी केली, तर भारतीय संघासाठी ही जमेची बाजू ठरेल.

पावर प्लेमध्ये दबाव

वेगवान गोलंदाजीत भारतीय संघाची कमान मोहम्मद शमीसह भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग यांच्याकडे आहे. पावर प्लेमध्ये भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीपने चांगली कामगिरी केली होती. या दोघांनी पावर प्लेमध्ये पाकिस्तान, दक्षिण आफ्रिकेला चांगलीच मात दिली होती. आजच्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही अशीच कमाल झाली, तर भारतासाठी आजचा सामना जिंकणं सोपं जाईल, कारण इंग्लंडची मधली फळी या स्पर्धेत कमकूवत असल्याचं चित्र आहे.

स्पिनर्सचा दबदबा

हा सामना अॅडलेडच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. इथे स्पिनर्सला काहीशी मदत होते. या मैदानावर टी-२० मध्ये सर्वाधिक ८ विकेट ऑस्ट्रेलियाचा स्पिनर एडम जम्पाने घेतल्या आहेत. अशात जर आर. अश्विन किंवा युजवेंद्र चहलला ही संधी मिळाली, तर ते अक्षर पटेलसह मिळून इंग्लंडचा मिडल ओव्हर्समध्ये धुव्वा उडवू शकतात.

इंग्लंडचे टॉप-५ खेळाडू

जॉस बटलर, एलेक्स हेल्स, बेन स्टोक्स, सॅम करन आणि क्रिस वोक्स हे पाच खेळाडू इंग्लंडच्या संघाची मजबूत भिंत आहेत. जर भारतीय संघ या पाच खेळाडूंवर मात करू शकला, तर हा सामना आपल्या ताब्यात येऊ शकतो. भारतीय संघासाठी चांगली बाब म्हणजे, डेविड मलान आणि मार्क वुड हे खेळाडू जखमी असल्याने खेळू शकणार नाहीत.

क्षेत्ररक्षण

केवळ दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना वगळल्यास, भारतीय संघ या स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना ही दिसले आहेत. अशात भारतीय संघाला फायनलचं तिकीट मिळवायचं असेल, तर आधीच्या सामन्यांप्रमाणे या सामन्यातही जबरदस्त फिल्डिंग करावी लागेल. फिल्डिंगमध्ये एक-एक रन वाचवून कॅच घेण्याची संघी सोडू नये. दक्षिण अफ्रिकेदरम्यान केलेली चूक पुन्हा न झाल्यास सामना जिंकण्यास मदत होऊ शकते.