भारतीय संघासमोर श्रीलंका बेचिराख; ७ गड्यांनी मात
क्रीडा

भारतीय संघासमोर श्रीलंका बेचिराख; ७ गड्यांनी मात

कोलंबो : कोलंबोत रंगलेल्या पहिल्या वनडे सामन्यात नव्या दमाच्या टीम इंडियाने श्रीलंकेला ७ गड्यांनी धूळ चारत विजय मिळवला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनने नाबाद ८६ धावांची खेळी करत नेतृत्वातील पहिल्या विजयाची नोंद केली. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार दासुन शनाका, चमिका करुणारत्ने यांनी दिलेल्या योगदानाच्या जोरावर लंकेने टीम इंडियासमोर ५० षटकात ९ बाद २६२ धावा केल्या. मात्र हे आव्हान टीम इंडियाने सहज पेलले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

युवा फलंदाज पृथ्वी शॉने ४३ तर पदार्पणवीर इशान किशनने ५९ धावा करत श्रीलंकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. आक्रमक सलामी देणाऱ्या पृथ्वीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेच्या २६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी आक्रमक सुरुवात केली. पृथ्वीने २४ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. त्यानंतर इशान किशन मैदानात आला. त्याने ३३ चेंडूत अर्धशतक झळकावत लंकेच्या गोलंदाजांची हवाच काढून टाकली. दुसऱ्या बाजूला कर्णधार शिखर धवनने संयमी खेळी करत संघाला विजयाजवळ नेले. ३१व्या षटकात धनंजय डि सिल्वाने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या मनीष पांडेला बाद केले. ३१व्या षटकात शनाकाने मनीषचा झेल घेतला. मनीषने २६ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने नाबाद ३१ धावांचे योगदान दिले. त्याने ५ चौकार लगावले. नाबाद ८६ धावांची खेळी करणाऱ्या धवनने संदाकनच्या चेंडूवर एक धाव घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, श्रीलंकेकडून मिनोद भानुका आणि अविष्का फर्नांडो यांनी फलंदाजीला सुरुवात केली. भारताकडून उपकर्णधार भुवनेश्वर कुमारने गोलंदाजीची सलामी दिली. भानुका-फर्नांडो जोडीने पहिल्या गड्यासाठी ४९ धावांची भागीदारी केली. भारताचा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने पदार्पणवीर भानुका राजपक्षाला त्यानंतर मिनोद भानुकाला बाद करत लंकेला संकटात टाकले. शतकाच्या आत सुरुवातीचे तीन गडी बाद झाल्यानंतर कर्णधार दासुन शनाका आणि चरिथा असालांकाने लंकेला स्थिरता दिली. असालांकाने ३८ तर शनाकाने ३९ धावांचे योगदा देत लंकेला दोनशे धावांच्या पार पोहोचवले. टीम इंडिया लंकेला अडीचशेच्या आत गुंडाळणार असे वाटत असताना चमिका करुणारत्नेने भुवनेश्वर कुमारवर हल्ला चढवला. त्याने भुवनेश्वरच्या शेवटच्या षटकात १९ धावा कुटत संघाला २६२ अशी धावसंख्या गाठून दिली. भारताकडून दीपक चहर, कुलदीप यादव आणि यजुर्वेंद्र चहल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.