दीपक चहरने केला कहर ! ठरला टीम इंडियाच्या विजयाचा बाजीगर
क्रीडा

दीपक चहरने केला कहर ! ठरला टीम इंडियाच्या विजयाचा बाजीगर

कोलंबो : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या चित्तथरारक दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने श्रीलंकेवर ३ गडी राखून विजय मिळवला आहे. सलामीवीर अविष्का फर्नांडो आणि असालांका यांची अर्धशतके आणि तळाचा फलंदाज चमिका करुणारत्नेने ४४ धावांचे योगदान दिल्यामुळे श्रीलंकेने ५० षटकात ९ बाद २७५ धावा केल्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने १९३ धावांवर ७ गडी गमावल होते. सूर्यकुमारने आपले पहिलवहिले वनडे अर्धशतक ठोकले. तो बाद झाल्यानंतर भारत पराभवाच्या छायेत सापडला होता. मात्र, भारताचा फलंदाज दीपक चहर आणि उपकर्णधार भुवनेश्वर कुमार लंकेसाठी डोकेदुखी ठरले. दीपकने झुंजार अर्धशतकी खेळी करत भुवनेश्वरसोबत ८४ धावांची अभेद्य भागीदारी रचली. चिवट फलंदाजीमुळे या दोघांनी लंकेच्या तोंडचा विजयाचा घास हिरावला. चहरला सामनावीर पुरस्कार मिळाला. भारताने या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

श्रीलंकेकडून मिनोद भानुका आणि अविष्का फर्नांडो यांनी दमदार सलामी देत आठव्या षटकात संघाचे अर्धशतक फलकावर लावले. त्यानंतर अविष्का फर्नांडोने धनंजय डि सिल्वासोबत भागीदारी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो अर्धशतक केल्यानंतर माघारी परतला. फर्नांडोने ४ चौकार आणि एका षटकारासह ५० धावा केल्या. दीपक चहरने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या धनंजय डि सिल्वाला कर्णधार धवनकरवी झेलबाद केले. चहलने पुन्हा कर्णधार दासुन शनाकाची दांडी गुल केली. मधल्या फळीत असालांकाने ६ चौकारांसह ६५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाच्या धावसंख्येत योगदान दिले. लंकेचा तळाचा फलंदाज चमिका करुणारत्नेने धावांचे योगदान दिल्यामुळे लंकेला पावणेतीनशेचा टप्पा ओलांडता आला. शेवटच्या दोन चेंडूवर करुणात्नेने दोन चौकार खेचले. करुणारत्नेने ५ चौकारांसह नाबाद ४४ धावांची खेळी केली. भारताकडून चहल आणि भुवनेश्वरला प्रत्येकी ३ बळी घेता आले. दीपक चहरने २ बळी टिपले.