शुबमन गिलने मोडला गावसकरांचा ५० वर्षे जुना विक्रम
क्रीडा

शुबमन गिलने मोडला गावसकरांचा ५० वर्षे जुना विक्रम

ब्रिस्बेन : चौथ्या कसोटीत पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या शुबमन गिलने दमदार अर्धशतकी खेळी केली. आपला तिसराच कसोटी सामना खेळणारा शुबमन गिल याने १४६ चेंडूत त्याने ९१ धावांची खेळी केली. शतकाने त्याला हुलकावणी दिली पण त्याने लिटल मास्टर सुनील गावसकरांचा विक्रम मोडीत काढला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शुबमन गिलने अतिशय दमदार फलंदाजी केली. नव्वदीत असताना त्याने नॅथन लायनच्या बाहेरच्या रेषेत असलेल्या चेंडूला बॅट लावली आणि तो झेलबाद झाला. पण ८ चौकार आणि २ षटकारांसह त्याने भारताला लय मिळवून दिली. या खेळीसोबतच गिलने सुनील गावसकर यांचा ५० वर्ष जुना विक्रम मोडला. कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात अर्धशतक ठोकणारा तो सर्वात कमी वयाचा भारतीय ठरला. गिलने २१ वर्ष आणि १३३ दिवसांचा असताना हा पराक्रम केला. गावसकरांनी १९७०-७१ मध्ये वेस्ट इंडिविरूद्ध २१ वर्षे आणि २४३ दिवसांचे असताना चौथ्या डावात अर्धशतक झळकावलं होतं. गावसकर त्या डावात ६७ धावाच करू शकले होते.

दरम्यान, पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी घेतल्यावर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४वर आटोपला. स्टीव्ह स्मिथने दमदार अर्धशतक (५५) ठोकलं. डेव्हिड वॉर्नर (४८), मार्कस हॅरिस (३८) आणि कॅमेरॉन ग्रीन (३७) या तिघांनीही चांगल्या छोटेखानी खेळी केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला २९४ धावांपर्यंत मजला मारता आली आणि त्यांनी भारताला ३२८ धावांचे लक्ष्य दिले.