पाचव्या सामन्यातही भारताचा पराभव; आफ्रिकेचा 4-1ने विजय
क्रीडा

पाचव्या सामन्यातही भारताचा पराभव; आफ्रिकेचा 4-1ने विजय

लखनऊ : भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघातील पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. आफ्रिका संघाने भारताला 5 गड्यांनी धूळ चारली. या विजयासह आफ्रिकाने पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका 4-1 अशी जिंकली. बोशच्या अर्धशतकी खेळीमुळे तिला सामनावीर तर, लिझेली ली हिला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारताच्या 189 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना 30 धावांच्या आत भारताने आफ्रिकेच्या लोरा वॉलवॉर्ट(0), लारा गुडऑल(1) आणि कर्णधार सुने लूस(10) यांना बाद करत रंगत निर्माण केली. यानंतर डु प्रेज आणि एने बोश यांनी संघाला आधार दिला. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी 96 धावांची भागिदारी रचली. बोशने 8 चौकारांसह 58 तर, डु प्रेजने 4 चौकारांसह 57 धावा केल्या. ही जोडी तुटल्यानंतर मरिजाने काप आणि क्लर्कने संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून राजेश्वरी गायकवाडने 3 तर, हेमलता आणि सी. प्रत्युषा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

प्रथम फलंदाजी करताना भारताने 49.3 षटकात 9 बाद 188 धावा केल्या. संघाची कर्णधार मिताली राजच्या नाबाद 79 धावांमुळे भारताला आफ्रिकेसमोर माफक आव्हान ठेवता आले. प्रिया पुनिया आणि स्मृती मंधना यांनी डावाची सुरुवात केली. कापने प्रिया पुनियाची (18) दांडी गुल करत आफ्रिकेला पहिले यश मिळवून दिले. मालिकेत दमदार फॉर्मात खेळणारी पुनम राऊत या सामन्यात अपयशी ठरली. तिला 10 धावांवर नोंडुमिसो शांगसेने बाद केले. सलामीवीर स्मृती मंधनाही 18 धावांवर तंबूत परतली. त्यानंतर मिताली राज आणि हरमनप्रीतने संघाची धावगती वाढवली. मात्र, काही कालावधीनंतर दुखापतीमुळे हरमनप्रीतने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. तिने 3 चौकारांच्या मदतीने 30 धावा केल्या.