ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०० धावांवर आटोपला; भारतासमोर ७० धावांचं आव्हान
क्रीडा

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०० धावांवर आटोपला; भारतासमोर ७० धावांचं आव्हान

मेलबर्न : मेलबर्न कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०० धावांत संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारताला विजयासाठी केवळ ७० धावांचं आव्हान मिळालं आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांत गुंडाळल्यानंतर भारताने पहिल्या डावात अजिंक्य रहाणेचं शतक आणि जाडेजाच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर ३२६ धावांपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला सामन्यात वरचढ होण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ ६९ धावांची आघाडी घेऊ शकला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियन संघाने ६ बाद १३३ पर्यंत मजल मारत दोन धावांची आघाडी मिळवली. कॅमरुन ग्रीन आणि पॅट कमिन्स या जोडीने भारतीय गोलंदाजांना सुरुवातीच्या सत्रात चांगलंच झुंजवलं. अखेरीस कमिन्सला बाद करत बुमराहने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर ठराविक अंतराने कॅमरुन ग्रीनही मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ४५ धावांची खेळी केली. सातव्या विकेटसाठी ग्रीन आणि कमिन्स यांच्यातील ५७ धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.

यानंतर नॅथन लियॉनही सिराजच्या गोलंदाजीवर स्वस्तात माघारी परतला. ऑस्ट्रेलियाचे ९ गडी माघारी परतल्यामुळे पंचांनी पहिल्या सत्राचा खेळ अर्ध्या तासाने वाढवला. जोश हेजलवूड आणि मिचेल स्टार्क जोडीने भारतीय गोलंदाजांना अखेरपर्यंत झुंजवत संघाला द्विशतकी टप्पा गाठून दिला. अखेरीस आश्विनने जोश हेजलवूडचा त्रिफळा उडवत कांगारुंचा दुसरा डाव २०० धावांवर संपवला. दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद सिराजने ३, बुमराह-आश्विन आणि जाडेजा या अनुभवी त्रिकुटाने प्रत्येकी २-२ तर उमेश यादवने १ बळी घेतला.