Road Safety Series: युवराज-सचिनची धमाकेदार फलंदाजी; भारताचा फायनलमध्ये प्रवेश
क्रीडा

Road Safety Series: युवराज-सचिनची धमाकेदार फलंदाजी; भारताचा फायनलमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : युवराज सिंह आणि सचिन तेंडुलकरच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर इंडिया लेजंड्सने वेस्टइंडीज लेजंड्सचा 12 धावांनी पराभव केला आहे. भारतीय लेंजड्स संघाने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज टी-20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात दमदार फलंदाजीनंतर गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर इंडिया लेजंड्सने वेस्टइंडीज लेजंड्सला धुळ चारली, आणि अंतिम सामन्यात धडक दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नाणेफेक गमावल्यामुळे प्रथम फलंदाजी करताना इंडिया लेजंड्सने तीन गडी गमावून 219 धावांचं विशाल लक्ष्य दिलं. त्यानंतर वेस्टइंडीजच्या संघाला 20 षटकांमध्ये 206 धावांवर रोखलं. आता अंतिम सामन्यात इंडिया लेजंड्सचा सामना श्रीलंका लेजेंड्स आणि दक्षिण आफ्रीका लेजंड्स यांच्यातील विजेत्या संघासोबत होईल. शुक्रवारी श्रीलंका लेजंड्स आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार आहे, तर रविवारी अंतिम सामना होईल.

इंडिया लेजेंड्सने दिलेल्या 219 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्टइंडीजची पहिली विकेट 19 धावांवर गमावली. विल्यम पर्किन्स फक्त 9 धावा काढून बाद झाला. त्यानंतर ड्वेन स्मिथने (63) या मालिकेतील पहिलं अर्धशतक झळकावलं आणि विंडिजची धावसंख्या 100 पार पोहोचवली. स्मिथने नरसिंह डोनरेन (59) याच्यासोबत 99 धावांची भागीदारी केली आणि विंडिजला विजयाजवळ नेण्याचा प्रयत्न केला. पण धोकादायक ठरु पाहणारी ही जोडी इरफान पठाणने तोडली, त्याने स्मिथला यूसुफ पठाणच्या हातीता झेल देण्यास भाग पाडलं. स्मिथने चेंडूत 9 चौकार आणि दोन षटकार मारले. स्मिथ बाद झाल्यावर प्रज्ञान ओझाने पुढच्याच षटकात किर्क एडवडर्सला खातंही न खोलू देता तंबूत पाठवलं. त्यानंतर लारा आणि डोनरेनने चौथ्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली आणि विजयाची आशा कायम ठेवली. पण अखेरच्या षटकात विजयासाठी 17 धावांची गरज असताना वेस्टइंडिज लेजंड्सचा संघ 206 धावाच बनवू शकला.