भारताचा दणदणीत विजय; कृणाल-कृष्णाची पदार्पणात दमदार कामगिरी
क्रीडा

भारताचा दणदणीत विजय; कृणाल-कृष्णाची पदार्पणात दमदार कामगिरी

पुणे : कसोटी आणि टी-20 मालिकेत दमदार प्रदर्शन केल्यानंतर भारताने आज (ता. २३) एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळविला. भारताने इंग्लंडला 66 धावांनी नमवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नाणेफेक गमावलेल्या भारताने प्रथम फलंदाजी करत निर्धारित 50 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 317 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 251 धावांवर सर्वबाद झाला. डावाच्या सुरुवातीला महागड्या ठरलेल्या प्रसिध कृष्णाने उत्तरार्धात दमदार कमबॅक करत इंग्लंडला हादरे दिले. भारताकडून 98 धावांची खेळी साकारणाऱ्या धवनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

भारताच्या 318 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने दमदार सुरुवात केली होती. 14व्या षटकापर्यंत इंग्लंडने बिनबाद 135 धावा कुटल्या. त्यानंतर कृष्णाने रॉयला माघारी धाडत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील पहिली विकेट साजरी केली. रॉयने 7 चौकार आणि एका षटकारासह 46 धावा केल्या. रॉयनंतर आलेला बेन स्टोक्स आपली छाप पाडू शकला नाही. कृष्णाने त्याला झेलबाद केले. सलामीच्या पडझडीनंतर मॉर्गन-बेअरस्टो जोडीने दबाव झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठा फटका खेळण्याच्या नादात बेअरस्टोने शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर सोपा झेल दिला. 66 चेंडूत 6 चौकार आणि 7 षटकारांसह बेअरस्टोने 94 धावांची खेळी केली.

बेअरस्टोनंतर भारताच्या गोलंदाजांनीही दमदार कमबॅक करत इंग्लंडला अडचणीत टाकले. शार्दुलने इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गनला खेळपट्टीवर स्थिरावू दिले नाही. मॉर्गन यष्टीरक्षक राहुलकडे झेल देऊन बाद झाला. त्याने 22 धावा केल्या. तिखट मारा करणाऱ्या शार्दुलने जोस बटलरला पायचित पकडत इंग्लंडला संकटात टाकले. त्यानंतर मोईन अली आणि सॅम बिलिंग्ज जोडीने संघर्ष केला. मात्र कृष्णाने बिलिंग्जला बाद करत ही जोडी फोडली. बिलिंग्जने 18 धावा केल्या. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने मैदानावर स्थिरावलेल्या मोईन अलीला वैयक्तिक 30 धावांवर बाद केले. त्यानंतर कृणालने सॅम करनला बाद करत आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्दीतील पहिला बळी घेतला. सॅम करननंतर इंग्लंडचे शेपटाकडचे फलंदाज पराभव टाळण्यात अपयशी ठरले. भारताकडून प्रसिध कृष्णाने 54 धावांत 4 बळी घेत दमदार पदार्पण केले. शार्दुल ठाकूरने 3, भुवनेश्वरने 2 तर कृणालने एक बळी घेत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

तत्पूर्वी, भारतीय फलंदाजीची सुरुवात संथ झाली होती. 13व्या षटकात भारताचे अर्धशतक पूर्ण झाले. त्यानंतर बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर रोहित बटलरकरवी झेलबाद झाला. त्यानंतर विराट कोहलीसोबत शिखर धवनने संघाची धावसंख्या पुढे नेली. सामन्याच्या 24व्या षटकात या दोघांनी भारताला शंभरीपार नेले. याच षटकात धवनने आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकी खेळीनंतर मार्क वूडने विराटला तंबुचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेला श्रेयस अय्यर 6 धावांची भर घालून वूडच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. स्टोक्सला फटका खेळताना धवन 98 धावांवर मॉर्गनकरवी झेलबाद झाला. धवननंतर आलेल्या हार्दिक पंड्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो एक धाव काढून बाद झाला.

भारत लवकर गाशा गुंडाळणार असे वाटत असताना पदार्पणवीर कृणाल पंड्याने जोरदार कामगिरी केली. राहुलला हाताशी घेत कृणालने आक्रमक फलंदाजी केली. पदार्पणाच्या सामन्यात कृणालने दमदार अर्धशतक ठोकले. कृणालनंतर राहुलनेही फॉर्ममध्ये येत आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी शतकी भागीदारी रचली. कृणालने 31 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 58 तर, राहुलने 43 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 62 धावा केल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 3 तर, मार्क वूडने 2 बळी घेतले.