छत्रसालमध्ये युवा कुस्तीपटूचा खून; सुशील कुमार फरार
क्रीडा

छत्रसालमध्ये युवा कुस्तीपटूचा खून; सुशील कुमार फरार

नवी दिल्ली : छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या भांडणात २३ वर्षीय कुस्तीपटू सागर राणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणात ऑलिम्पिक चॅम्पियन सुशील कुमारचेही नाव समोर आले असून पोलिसांनी अलीकडेच त्याच्या घरावर छापा टाकला होता, पण सुशीलकुमार फरार आहे. सुशीलकुमार शिवाय इतर २० आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरूद्ध लूक आऊट नोटीसही बजावली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या आरोपींचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस एनसीआर प्रदेश आणि आसपासच्या राज्यांत छापा टाकत आहेत. मॉडेल टाऊन परिसरातील फ्लॅट रिकामा करण्यासाठी हा वाद सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी प्रिन्स दलालला सुरुवातीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमार आणि त्याचे अन्य साथीदार भांडणात सहभागी होते. हा वाद ४ मे रोजी झाला होता, त्यात दोघे जखमीही झाले होते. सागरला तातडीने रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेप्रकरणी पोलीस कॅमेरा फुटेजद्वारे संबंधित लोकांचा शोध घेत आहेत. त्यामुळे काहींची ओळख पटवण्यात आली आहे. ज्यांची नावे समोर आली आहेत, पोलीस त्यांचे लोकेशन शोधत आहेत. या घटनेशी माझा काही संबंध नाही. आमचे कुस्तीपटू या भांडणात सामील नव्हते. आम्ही पोलिसांना कळवले, की काही अज्ञातांनी उडी मारुन हे भांडण केले, असे सुशील कुमारने घटनेच्या दुसर्‍याच दिवशी सांगितले होते.