उपकर्णधार पदावरून रोहितला हटविण्याच्या विराटच्या सूचना!
क्रीडा

उपकर्णधार पदावरून रोहितला हटविण्याच्या विराटच्या सूचना!

नवी दिल्ली : रोहित शर्माला भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदावरून हटविण्याची सूचना कर्णधार विराट कोहलीने केली असल्याचे वृत्त समोर आले आहे. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर या क्रिकेट प्रकारातील कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा कोहलीने गुरुवारी केली. या पार्श्वभूमीवर ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद रोहितकडे जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ३४ वर्षीय रोहितवरील अन्य दडपण कमी करण्यासाठी एकदिवसीय संघाचे उपकर्णधारपद के. एल. राहुलकडे सोपवावे आणि ट्वेन्टी-२० संघाचे ऋषभ पंतकडे देण्यात यावे अशा सूचना कोहलीने निवड समितीला दिल्याचे समजते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र, एकदिवसीय कर्णधारपद २०२३ पर्यंत सुरक्षित राहावे, याकरिता उत्तराधिकारी नसावा, याच हेतूने कोहलीने हा प्रस्ताव सादर केल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. कोहलीने बुधवारी आपल्या निर्णयाच्या निवेदनात निकटवर्तीय, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि रोहितशी चर्चा केल्याचे म्हटले आहे. माझ्या निर्णयप्रक्रियेत या गटाची महत्त्वाची भूमिका असते, असेही त्याने नमूद केले आहे. यातून कोहली आणि रोहित यांच्यातील मैत्रीबंध अधिक दृढ झाल्याचेही यातून दिसून येते.

ट्वेन्टी-२० संघाच्या नव्या कर्णधाराचा निर्णय विश्वचषकानंतरच जाहीर होणार आहे. रोहितकडे नेतृत्वाची धुरा सोपवल्यास राहुल, पंत व जसप्रीत बुमरा हे उपकर्णधारपदासाठी पर्याय असतील. कसोटी आणि एकदिवसीय संघांचे कर्णधारपद मात्र कोहलीकडे कायम राहणार आहे. मायदेशात २०२३ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेकडे लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशानेच ही रचना केली जात असल्याचे क्रिकेटवर्तुळात म्हटले जात आहे.