न्यूझीलंडचा खेळाडूही झाला सूर्याचा फॅन, म्हणाला ‘ त्याच्यासारखी फलंदाजी तर मला स्वप्नात पण…’
क्रीडा

न्यूझीलंडचा खेळाडूही झाला सूर्याचा फॅन, म्हणाला ‘ त्याच्यासारखी फलंदाजी तर मला स्वप्नात पण…’

माउंट माऊनगानुई : सध्या घडीला सूर्यकुमार यादवचे फॅन फक्त भारतात नाहीत, तर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूही आता त्याचे चाहते व्हायला लागले आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात तर सूर्याने धडाकेबाज शतक झळकावले आणि विक्रम रचला. न्यूझीलंडच्या संघातील ग्लेन फिलिपने तर आता सूर्याचे जोरदार कौतुक केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सूर्याने या सामन्यात फक्त शतक झळकावले नाही तर त्याने एक विक्रमही रचला. सूर्याने यावेळी भारताचा सिक्सर किंह युवराज सिंगचा विक्रमही मोडीत काढला आहे. आजच्या सामन्यात सूर्याने एकूण सात षटकार खेचले. या सात षटकारांसह त्याने युवीला मागे टाकले आहे. युवीने टी-२० क्रिकेटमध्ये ७४ षटकार लगावले होते. पण आज सूर्याने सात षटकार लगावले आणि त्याच्या नावावर एकूण ७९ षटकार झाले आहेत.

आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सूर्यकुमार यादवबाबत न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने एक महत्वाचे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, ” सूर्यकुमार यादवसारखा मी स्वनातही खेळू शकत नाही. मी त्याच्यासारख्या काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करेन, पण माझ्यापेक्षा त्याचा खेळ फारच वेगळा आहे. मनगटाचा पूर्ण वापर करत तो ज्यापद्धतीने षटकार मारतो, ते नजरेचे पारणे फेडणारे असते आणि यामध्ये त्याचा हात कोणीही धरू शकत नाही. त्यामुळे सूर्यकुमार यादव एक खास फलंदाज आहे.”

सूर्याने टी-२० विश्वचषकातही दमदार फलंदाजी केली होती. आता न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात तर सूर्याने कहरच केला. सूर्याने अखेरचा काही षटकांमध्ये अशी धडाकेबाज फटकेबाजी केली की, चाहत्यांसाठी ती एक मेजवानी ठरली. सूर्याने ३२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले,पण त्यानंतर सूर्या थांबला नाही तर त्यानंतर फक्त १७ चेंडूंत त्याने आपले शतक पूर्ण केले. सूर्याने या सामन्यात १११ धावांची धडाकेबाज खेळी साकारली आणि त्यामुळेच भारताला न्यूझीलंडवर मोठा विजय मिळवता आला. सूर्याने एकहाती हा विजय भारताला मिळवून दिला. त्यामुळे आता सूर्या पुढच्या सामन्यात कशी फलंदाजी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागेलेले असेल.