मोठी बातमी! पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक
क्रीडा

मोठी बातमी! पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक

टोकियो : भारताची टेबल टेनिसपटू भाविना पटेलने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतील महिला एकेरी श्रेणी चारची उपांत्य फेरी गाठली आहे. भाविनाने उपांत्यपूर्व फेरीत सर्बियाच्या खेळाडूचा पराभव केला. भाविनाने बोरिस्लावा रँकोविक पेरिकला ३-०असे हरवले आहे. पेरिकने रिओ पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पॅरालिम्पिकमध्ये टेबल टेनिस प्रकारात उपांत्य फेरी गाठणारी भाविना पटेल ही पहिली खेळाडू ठरली आहे. उपांत्य फेरी गाठून भाविनाने कांस्यपदक पक्के केले आहे. भाविना पटेलने गतविजेत्या पेरिकचा अवघ्या १८ मिनिटांत ११-५, ११-६, ११-७ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. याआधी शुक्रवारी भाविनाने ब्राझीलच्या जॉइस डी ऑलिव्हेरावर ३-० असा विजय मिळवला. भाविनाने जॉइसचा १२-१०, १३-११, ११-६ असा सरळ तीन सेटमध्ये पराभव करत गेम जिंकला आणि पुढील फेरीत प्रवेश केला.

उपांत्य फेरीत तिची लढत चीनच्या झांग मियाओशी होईल, पण ती अंतिम चारमध्ये पोहोचल्याने तिचे पदक पक्के झाले आहे. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये कांस्यपदकासाठीचा प्ले-ऑफचा सामना होणार नाही आणि उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन्ही खेळाडूंना कांस्यपदके मिळतील. भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या अध्यक्षा दीपा मलिक यांनी ट्विटरवर जारी केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे, हे निश्चित आहे की आम्ही तिला पदक जिंकताना पाहू. उद्या सकाळचा सामना (उपांत्य फेरी) ती कोणत्या रंगाचे पदक जिंकेल हे ठरवेल.