Tokyo Paralympics: भारताने कोरलं १७व्या पदकांवर नाव
क्रीडा

Tokyo Paralympics: भारताने कोरलं १७व्या पदकांवर नाव

टोक्यो : पॅरालिम्पिकमध्ये भारताची दमदार कामगिरी सुरु आहे. भारताने आतापर्यंत एकूण १७ पदकांवर नाव कोरले आहे. पुरुषांच्या SL3 प्रकारात जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले. तर याच प्रकारात मनोज सरकारने जपानच्या डेसुके फुजीहाराला पराभूत करत कांस्यपदक पटकावले. पुरुष एकेरीच्या SL4 प्रकारात, सुहास यथिराजने सुवर्णपदकाच्या लढतीत आपले स्थान निश्चित केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्रमोदपूर्वी भारताच्या मनीष नरवाल आणि सिंहराज अधाना यांनी P4 मिश्रित ५० मीटर पिस्तूल SH1 नेमबाजीमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवले. १९ वर्षीय नरवालने २१८.२ गुण मिळवत पॅरालिम्पिकमध्ये विक्रम केला आहे. दुसरीकडे, मंगळवारी कांस्य जिंकणाऱ्या सिंहराजने आज २१६.७ गुणांसह रौप्यपदक जिंकले. रशियन ऑलिम्पिक समितीचे सेर्गेई मालिशेव यांनी १९६.८ गुणांसह कांस्यपदक जिंकले. यापूर्वी पात्रता फेरीत सिंहराज अधाना ५३६ गुणांसह चौथ्या आणि नरवाल ५३३ गुणांसह सातव्या स्थानावर होता.

भारताच्या खात्यात आता टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये १७ पदके झाली आहेत. भारताने ४ सुवर्ण, ७ रौप्य आणि ६ कांस्यपदके जिंकली आहेत. पॅरालिम्पिक १९६० पासून होत आहे. भारत १९६८ पासून पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. भारताने १९७६ आणि १९८० मध्ये भाग घेतला नाही.