आर अश्विनकडून ऑस्ट्रेलियन कर्णधाराची बोलती बंद
क्रीडा

आर अश्विनकडून ऑस्ट्रेलियन कर्णधाराची बोलती बंद

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. अशातच सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराची जबरदस्त खिल्ली उडवली. त्याने ट्विट करुन टीम पेनला चिमटा काढला आहे. सिडनीत तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी २५९ चेंडू खेळून काढत सामना अनिर्णीत राखला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अश्विन फलंदाजी करत असताना गाबा कसोटीत तुला बघण्यासाठी खूपच आतूर आहे… असं म्हणत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने अश्विनला डिवचलं होतं. त्यावर त्याचवेळी अश्विननेही तू भारतात ये… मी पण तुला भारतात खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहे. ती तुझी शेवटची मालिका असेल असं प्रत्युत्तर देऊन पेनची बोलती बंद केली होती. त्यानंतर आता गाबा कसोटीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर अश्विनने टीम पेनला टोला लगावलाय.

गाबामधून गुड इव्हिनिंग… मी इथे सामना खेळू शकलो नाही त्यासाठी माफी मागतो. पण, आमचं आदरातिथ्य केल्याबद्दल आणि खडतर काळात चांगलं क्रिकेट खेळल्याबद्दल धन्यवाद! ही मालिका आम्हाला आयुष्यभर आठवणीत राहिल! असं खोचक ट्विट अश्विनने केलं आहे. हे ट्विट करताना अश्विनने टीम पेनला आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत अकाउंटलाही टॅग केलं आहे.