IPL 2021 : तब्बल ८ वर्षांनंतर या भारतीय खेळाडूने केली लिलावासाठी नोंदणी
क्रीडा

IPL 2021 : तब्बल ८ वर्षांनंतर या भारतीय खेळाडूने केली लिलावासाठी नोंदणी

नवी दिल्ली : आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने १८ फेब्रुवारीला लिलाव प्रक्रिया पार पडेल असं स्पष्ट केलं. त्यानंतर आता तब्बल ८ वर्षांनंतर एका क्रिकेटपटूने लिलावात आपली नाव नोंदणी केली असल्याची माहिती मिळाली आहे. आयपीएल 2021च्या हंगामासाठी होणाऱ्या लिलावासाठी भारताचा वेगवान गोलंदाज श्रीसंत यानेही आपलं नाव नोंदवलं असल्याचं वृत्त इएसपीएनक्रिकइन्फोने दिली आहे. त्याने आपली बेसप्राईज ७५ लाख रुपये फिक्स केले असल्याचे सांगण्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या लिलावासाठी १ हजारांहून अधिक खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे. त्यात श्रीसंतचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. नियमानुसार, १ हजार ०९७ खेळाडूंच्या नोंदणीची यादी प्रत्येक संघाला दिली जाईल आणि त्यातून एखाद्या संघाने श्रीसंतला विकत घेण्यात रस दाखवला तरच त्याला अंतिम लिलावात संधी मिळेल. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार केवळ एका दिवसाच्या असलेल्या या लिलावप्रक्रियेत केवळ ५०-६० खेळाडूंचीच नावं अंतिम यादीत येणार आहेत.

श्रीसंत आयपीएलमध्ये २०१३ साली खेळला होता. त्यानंतर स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणात त्याच्यावर आजीवन क्रिकेटबंदी घालण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयामुळे ती बंदी ७ वर्षांपर्यंत कमी करण्यात आली. त्यानंतर अखेर २०२०मध्ये त्याला पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरण्याची संधी मिळाली. श्रीसंतने ४४ आयपीएल सामन्यात ४० बळी घेतले. राजस्थान रॉयल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोची तस्कर्स केरला या संघाचं त्याने प्रतिनिधित्व केलं.