भारतीय संघाला मोठा धक्का; हा स्टार खेळाडू टी-२० मालिकेतून बाहेर
क्रीडा

भारतीय संघाला मोठा धक्का; हा स्टार खेळाडू टी-२० मालिकेतून बाहेर

सिडनी : भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला असून मालिकेतून भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा संघाबाहेर झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी-२० मालिकेची सुरुवात विजयाने केल्यानंतर हा भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे. पहिल्या सामन्यात नाबाद ४४ धावांची खेळी करुन टीम इंडियाला १६१ धावांचा महत्वपूर्ण टप्पा ओलांडून देण्यास रविंद्र जाडेजाने मदत केली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पहिल्या टी-२० सामन्यात फलंदाजीदरम्यान अखेरचं षटक खेळत असताना स्टार्कचा चेंडू जाडेजाच्या हेल्मेटला लागला. ज्यानंतर त्याला वैद्यकीय मदत घ्यावी लागली, यासाठी टीम इंडियाने Concussion Substitution अंतर्गत दुसऱ्या डावात युजवेंद्र चहलला मैदानावर उतरवलं. चहलनेही ३ बळी घेत कांगारुंच्या डावाला खिंडार पाडत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

भारतीय संघाचे फिजीओ नितीन पटेल आणि डॉक्टर रविंद्र जाडेजाच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. शनिवारी सकाळी जाडेजाला झालेल्या दुखापतीचं स्कॅनिंग होणार असून त्यानंतर त्याच्यावर काय उपचार करायचे याची दिशा ठरवली जाईल. निवड समितीने खबरदारीचा उपाय म्हणून मराठमोळ्या शार्दुल ठाकूरला उर्वरित टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघात जागा दिली आहे. १-० ने आघाडीवर असलेल्या भारतीय संघाचा दुसरा सामना रविवारी खेळवला जाणार आहे.