भारताच्या विश्वकरंडक विजेत्या क्रिकेटपटूची २८व्या वर्षी निवृत्ती
क्रीडा

भारताच्या विश्वकरंडक विजेत्या क्रिकेटपटूची २८व्या वर्षी निवृत्ती

नवी दिल्ली : भारताच्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक विजेत्या संघाचा सदस्य असलेला क्रिकेटपटू स्मित पटेलने २८व्या वर्षी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. स्मित पटेलने बीसीसीआयला आपल्या निवृत्तीचे पत्र पाठवले असून यात त्याने भारतासाठी क्रिकेट खेळण्याचा पाठ पूर्ण झाल्याचे सांगितले आहे. तो आता अमेरिकेत जाऊन क्रिकेट खेळणार आहे. स्मित २०१२ला झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा सदस्य होता. पटेलने अंतिम सामन्यात नाबाद ६२ धावा फटकावल्या आणि कर्णधार उन्मुक्त चंद याच्याबरोबर शतकी भागीदारी केली, ज्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाला सहा गडी राखून पराभूत केले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बीसीसीआयच्या नियमानुसार, निवृत्ती न घेता कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला विदेशात क्रिकेट लीग खेळता येत नाही. त्यामुळे स्मितने हे मोठे पाऊल उचलले आहे. स्मितला अमेरिकेत जाऊन आपली क्रिकेट कारकीर्द पुन्हा घडवायची आहे. या कारणास्तव, त्याने भारतीय क्रिकेटपासून स्वत: ला वेगळे करण्याचा निर्णय घेतला. स्मितने घरगुती क्रिकेटमध्ये गुजरात, गोवा आणि त्रिपुरा आणि बडोद्याकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळला आहे. स्मितने २८ टी-२० सामन्यात चार अर्धशतकांच्या मदतीने ७०८ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने २४ बळीही घेतले आहेत.

स्मित कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (सीपीएल) बार्बाडोस ट्रायडंट्सकडून खेळताना दिसणार आहे. सीपीएल २०२१मध्ये ३३ सामने खेळले जातील आणि सर्व सामने सेंट किट्स आणि नेव्हिसमधील वॉर्नर पार्क येथे खेळले जातील. सीपीएलच्या सहा संघांनी त्यांच्या खेळाडूंची यादी जाहीर केली. या वेळी या स्पर्धेत १०१ खेळाडू खेळताना दिसतील. काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर पहिल्यांदा सीपीएलमध्ये भाग घेईल. तोसुद्धा बार्बाडोस ट्रायडंट्सकडून खेळताना दिसणार आहे.