लॉर्ड्सवर भारताची जबरदस्त कामगिरी; दुसऱ्या डावात इंग्लंडची दाणादाण!
क्रीडा

लॉर्ड्सवर भारताची जबरदस्त कामगिरी; दुसऱ्या डावात इंग्लंडची दाणादाण!

लॉर्ड्स : कसोटीच्या पाचव्या दिवशी इंग्लंडला ६० षटकात २७२ धावांचे आव्हान मिळाले होते, पण भारतासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. इंग्लंडचा एकही फलंदाज झुंज देताना दिसला नाही. त्यांचे सर्व फलंदाज ५१.५ षटकात १२० धावांत गारद झाले. भारताकडून मोहम्मद सिराजने ४, इशांतने ३ तर मोहम्मद शमीने २ बळी घेत इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यांचे अष्टपैलू योगदान तर मोहम्मद सिराज, इशांत शर्मा यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडचा १५१ धावांनी पराभव केला. पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या भारताच्या लोकेश राहुलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. भारताने या विजयासह पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

आज उपाहारापर्यंत भारताने आपला दुसरा डाव ८ बाद २९८ धावांवर घोषित केला. भारताने सकाळी ऋषभ पंतला (२२) गमावल्यानंतर डाव लवकर आटोपणार असे सर्वांना वाटत होते, पण जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी नवव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी उभारली. भारताने डाव घोषित झाला तेव्हा मोहम्मद शमीने ६ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५६ तर जसप्रीत बुमराहने नाबाद ३४ धावा केल्या. वेगवान गोलंदाज मार्क वुडने इंग्लंडसाठी ३ बळी घेतले. तर रॉबिन्सन आणि मोईन अली यांना प्रत्येकी २ बळी मिळाले.

इंग्लंडचा पहिला डाव
इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या १८० धावांच्या नाबाद खेळीमुळे संपूर्ण इंग्लंडचा पहिल्या डावात ३९१ धावांवर खेळ आटोपला. पहिल्या डावाच्या जोरावर इंग्लिश संघाने २७ धावांची आघाडी घेतली होती.

भारताचा पहिला डाव
इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलामीवीर फलंदाज लोकेश राहुलच्या १२९ धावांच्या मदतीने भारताने पहिल्या डावात ३६४ धावा केल्या.